विधी समिती सभापती तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अॅड. धर्मपाल मेश्राम यांचे अन्न व नागरी पुरवठा अधिका-यांना पत्र
नागपूर : केंद्र शासनाने ‘पंतप्रधान गरीब कल्याण’ योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो रेशन तर राज्य शासनाने प्राधान्य कुटूंब लाभार्थी व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना तीन महिन्याचे रेशन अग्रीम देण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र रेशन उचल करण्यास गेलेल्या लाभार्थ्यांना फक्त १ महिन्याचे रेशन देण्यात येत असून यासंबंधी आदेश अन्न व नागरी पुरवठा अधिका-यांमार्फत देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांमध्ये याविषयी संभ्रम असून याबाबत आपण स्वतः खुलासा करावा, अशा मागणीचे पत्र मनपाचे विधी समिती सभापती तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी जिल्हाधिकारी श्री रवींद्र ठाकरे व अन्न नागरी पुरवठा अधिकारी श्री सवाई यांना दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे गरीब, कष्टकरी लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी केंद्र व राज्य सरकारने मोफत अन्नधान्य देण्याचे जाहीर केले. त्यानुसार केंद्र सरकारद्वारे ‘पंतप्रधान गरीब कल्याण’ योजनेअंतर्गत प्रतिव्यक्ती प्रतिमाह पाच किलो रेशन मोफत देण्याचे तर राज्य सरकारद्वारे प्राधान्य कुटूंब लाभार्थी व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना तीन महिन्याचे रेशन अग्रीम देण्याचे निर्देशित करण्यात आले आहेत.
मात्र रेशन घेण्यास जाणा-यांना एकाच महिन्याचे अन्नधान्य वितरित करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. या सर्व प्रकाराची शहानिशा करून यामधील सत्यता व अनुषंगीय खुलासा करावा, अशी मागणी मनपाचे विधी समिती सभापती तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्राद्वारे अन्न व नागरी पुरवठा अधिका-यांना केली आहे, त्याचप्रमाणे सर्वसामान्य कष्टकरी जनतेला प्रशासनाने वेठीस धरू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.