Published On : Sat, Feb 16th, 2019

हमसफर एक्स्प्रेसला पालकमंत्र्यांनी दाखविली हिरवी झेंडी

Advertisement

नागपूर: पांढरकवडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हमसफर एक्स्पेसला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर नागपुरात अजनी रेल्वे स्थानकावर अजनी-पुणे हमसफर एक्स्प्रेसला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिरवी झेंडी दाखवून या गाडीच्या प्रवासाचा शुभारंभ केला व गाडीतील प्रवाशांना सुखकर प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.

अजनी रेल्वे स्थानकावर झालेल्या या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, खा. डॉ. विकास महात्मे, आ. कृष्णाजी खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, भाजपानेते अरविंद गजभिये, रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक त्रिलोक कोठारी, मुख्य यांत्रिक अभियंता मनोज जोशी व अन्य उपस्थित होते. नागरिकांची पुणेसाठ़ी आणखी एका वेगवान गाडी सोडण्याची मागणी दीर्घ काळापासून होती, ती आज पूर्ण झाली असून रस्तावाहतुकीतून प्रवाशांची होणारी लूट आता थांबणार आहे, असे सांगून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. ही गाडी आठवड्यातून एक दिवस असून एकदा अजनी व एकदा मुख्य स्थानकाहून सुटणार आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी रेल्वे प्रशासनाने पांढकवड्याच्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचे थेट प्रसारण अजनी स्थानकावर उपलब्ध केले होते. त्यामुळे तेथील पूर्ण कार्यक्रम उपस्थितांना पाहता आला व सर्वांची भाषणे ऐकता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणही उपस्थित प्रवाशांनी व नागरिकांनी यावेळी ऐकले.