
मुंबई : आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून राज्यात आंदोलन सुरू असतानाच आता विद्यार्थिनींबाबतच्या कथित नियमामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. सुट्टीवरून आश्रमशाळेत परतणाऱ्या १३ वर्षांवरील विद्यार्थिनींची गर्भधारणा चाचणी करून घेण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे पालक आणि विद्यार्थिनींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
आश्रमशाळेतील विद्यार्थिनी सुट्टीच्या काळात आपल्या कुटुंबीयांकडे जातात. सुट्टी संपल्यानंतर शाळेत परतताना प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयातून प्रेग्नेंसी टेस्ट करून घेण्यास सांगितले जात असल्याचे समोर आले आहे. विशेषतः अल्पवयीन मुलींना अशा प्रकारच्या तपासणीला सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्या गोपनीयतेचा आणि मानसिकतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आश्रमशाळांमधील शिक्षण, सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचे प्रश्न आधीच चर्चेत असताना या कथित आदेशामुळे पालकांचा संताप आणखी वाढला आहे. “मुलींच्या सुरक्षेच्या नावाखाली अशा प्रकारची तपासणी करण्याची गरज काय?” असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, या कथित निर्देशामागे प्रशासनाचा नेमका उद्देश काय आहे आणि असा आदेश अधिकृतपणे देण्यात आला आहे का, याबाबत संबंधित विभागाकडून स्पष्टता अपेक्षित आहे.\




