
नागपूर : प्रामाणिकपणा आणि कठोर शिस्तीसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अखेर आपल्या मनातील खदखद उघड केली आहे. नागपूर महानगरपालिका व स्मार्ट सिटी प्रकल्पातील त्यांच्या कार्यकाळाशी संबंधित जुने आरोप पुन्हा पुन्हा पुढे आणले जात असल्याने सतत मानसिक तणाव सहन करावा लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मुंढे म्हणाले, “एका प्रामाणिक अधिकाऱ्याला अखेर किती वेळा त्रास द्यायचा? नागपूरमध्ये काम करत असताना मी गैरप्रकारांना थारा दिला नाही. त्याचाच राग मनात धरून काही लोक आजही माझ्याविरोधात कारस्थान रचत आहेत. माझ्यावर लावलेल्या आरोपांची चौकशी झाली असून, त्यातून मला निर्दोष ठरवण्यात आले आहे. तरीही तेच मुद्दे पुन्हा उकरून काढले जात आहेत.”
नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पातील कथित अनियमिततेचा मुद्दा हिवाळी अधिवेशनात पुन्हा चर्चेत आला होता. भाजप आमदारांनी केलेल्या आरोपांनंतर ईओडब्ल्यू आणि पोलिसांनी चौकशी केली. या दोन्ही तपासांमध्ये मुंढेंना क्लीनचिट मिळाली असतानाही जुने आरोप पुन्हा समोर आणले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
तुकाराम मुंढेंची प्रशासकीय कारकीर्द ही कायमच वादग्रस्त ठरली आहे. नियमबाह्य कामांवर कठोर कारवाई केल्यामुळे अनेकदा राजकीय रोषाला सामोरे जावे लागले. मात्र, सामान्य नागरिकांमध्ये आजही त्यांची प्रतिमा प्रामाणिक आणि धडाडीच्या अधिकाऱ्याचीच आहे.








