
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज महत्त्वाचा दिवस ठरण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता असून, राज्य निवडणूक आयुक्त श्री. दिनेश वाघमारे आज सोमवार (दि. १५ डिसेंबर २०२५) रोजी दुपारी ४ वाजता सह्याद्री अतिथिगृहात पत्रकार परिषद घेणार आहेत.
या पत्रकार परिषदेत मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील एकूण २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोगाने माध्यमांना अधिकृत निमंत्रण पत्र पाठवले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती दिली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
आधीच नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा झाली असून, आता महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष केंद्रीत झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित महापालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता तत्काळ लागू होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ३१ जानेवारी २०२६ पूर्वी राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यामुळे आजच महापालिका निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होण्याची शक्यता बळावली आहे.
या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंनी निवडणूक रणनिती आखण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक ही राज्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची लढत मानली जात असल्याने सर्वांचे लक्ष या घोषणेकडे लागले आहे.
आज होणाऱ्या पत्रकार परिषदेतून निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत रूपरेषा स्पष्ट होणार असून, त्यानंतर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.








