
नागपूर : लक्ष्मीनगरातील एका प्रसिद्ध कॅफेमध्ये हॅलोविनच्या निमित्ताने आयोजित ‘अर्बन फ्ली फेअर’ या कार्यक्रमावर आता गंभीर वादाचा गडद सावट पडले आहे. अल्पवयीन मुलींच्या सहभागाबाबत तसेच कार्यक्रमादरम्यान घडलेल्या धक्कादायक घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅफे मालकाने हा कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी १८ ते १९ वर्षे वयोगटातील तरुण आयोजकांच्या गटाला दिली होती. या गटाने दोन महिन्यांपूर्वीच व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून वॉलंटिअर्सची भरती सुरू केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे, या ग्रुपमध्ये काही अल्पवयीन मुलामुलींनाही सामील करण्यात आले होते.
२९ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान सर्व वॉलंटिअर्सना सूचना देण्यासाठी रात्री कॅफेमध्ये बोलावण्यात आले. त्यावेळी एका अल्पवयीन मुलीला तिच्या आईने स्वतः तिथे सोडले होते. आयोजकांनी तिला सांगितले होते की “रात्री ११ वाजेपर्यंत काम असेल.” मात्र, आई परत आली तेव्हा मुलगी तिथे नव्हती. आयोजकांनी सांगितले की ती ७ वाजताच निघून गेली आहे.
यानंतर मुलगी बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली. चौकशीत उघड झाले की ती मुलगी आयोजकांपैकी काही जणांसोबत त्रिमूर्ती नगर परिसरातील एका फ्लॅटमध्ये गेली होती, जिथे दारू पार्टी सुरू होती. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर मुलगी सापडली, मात्र ती नशेत असल्याचे समोर आले.
सदर मुलगी अल्पवयीन असल्याने पालकांनी समाजातील बदनामीच्या भीतीने औपचारिक तक्रार दाखल केली नाही, मात्र घटनेने पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त झाला आहे. “अल्पवयीनांना जबाबदारीशिवाय रात्रीच्या कार्यक्रमांत सामावून घेणे आणि त्यांना फ्लॅटमध्ये नेणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे,” असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, कॅफे मालकाने चौकशी केली असता आयोजकांपैकी एका तरुणाने “तो एका नेत्याच्या मुलाचा मित्र आहे” असे सांगून विषय मिटवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अल्पवयीनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, आयोजकांवर कारवाईची मागणी परिसरातून जोर धरत आहे.









