Published On : Wed, Oct 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरजवळ भीषण बस अपघात; चालकाचा जागीच मृत्यू,अनेक प्रवासी गंभीर जखमी

Advertisement

Nagpur Bus Accident: Driver Killed, Several Passengers Seriously Injured

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर बुधवारी पहाटे भीषण बस अपघात घडला. जबलपूरहून नागपूरच्या दिशेने येणारी प्रवासी बस डुमरी परिसरात पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या सुमारे सहा फूट खोल खड्ड्यात उलटली. या दुर्घटनेत बसचालक सुनील यादव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, MH27-8X 6521 क्रमांकाची ही प्रवासी बस जबलपूरहून नागपूरकडे येत होती. बुधवारी पहाटे साधारण ४ ते ५ वाजताच्या दरम्यान डुमरी परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्यालगत पुलाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात उलटली. भरपहाटे घडलेल्या या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली.

अपघाताची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत बसचे मोठे नुकसान झाले असून, चालकाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

बसवरील नियंत्रण नेमके कोणत्या कारणामुळे सुटले, तसेच बांधकाम सुरू असलेल्या पुलाजवळ आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याचा तपास पोलीस करत आहेत. अपघातामागील नेमके कारण तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.