
नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या प्रत्येक टप्प्यावर राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत ३८ पैकी २५ उमेदवार बाद झाले असले, तरी भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांच्यातील अंतर कायम आहे. कोहळे यांनी ४ हजार २७१ मतांची आघाडी घेतली असून, उर्वरित उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीच्या मतांमुळे निकालाचे चित्र बदलणार का, याची उत्सुकता वाढली आहे.
सध्याच्या मतमोजणीत सुधाकर कोहळे यांना ६१ हजार १ मते मिळाली आहेत, तर अभिजीत वंजारी यांच्या खात्यात ५६ हजार ७३० मते जमा झाली आहेत. त्यामुळे कोहळे यांची आघाडी कायम असली, तरी विजयावर शिक्कामोर्तब झालेले नाही. बाद फेरीतील उर्वरित मतांची मोजणी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
या संपूर्ण लढतीत तिसऱ्या क्रमांकावरील नितेश कराळे यांच्या मतांकडे विशेष लक्ष लागले आहे. कराळे यांना २४ हजार २४९ मते मिळाली आहेत. त्यांच्याशिवाय संजय थुल, सुमेध गडपायले, मंगेश वानखेडे आणि अतुल देशमुख यांच्या मतपत्रिकांवरील पुढील पसंतीच्या मतांची मोजणीही अद्याप बाकी आहे.
पसंतीक्रमानुसार होणाऱ्या मतमोजणीत या उमेदवारांच्या मतपत्रिकांवरील मते कोहळे आणि वंजारी यांच्यापैकी कोणाच्या बाजूने अधिक वळतात, यावर आघाडीचे अंतर अवलंबून असेल. विशेषतः कराळे यांच्या मतांचे वितरण निकालाला निर्णायक वळण देऊ शकते. मात्र, प्रत्यक्ष मतमोजणीचे आकडे समोर येईपर्यंत कोणाला किती फायदा होईल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे.
२५ उमेदवार बाद झाल्यानंतरही कोहळे यांनी आघाडी टिकवली आहे. आता उर्वरित बाद फेऱ्यांमध्ये त्यांची आघाडी आणखी वाढते की वंजारी पुनरागमन करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निकालाचा सस्पेन्स अद्याप कायम आहे.



