Published On : Wed, Oct 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्गावर वन्यजीवांचे मृत्युसत्र सुरूच;२० सांबरांसह १४० हून अधिक प्राण्यांचा बळी

चंद्रपूरजवळ मालगाडीच्या धडकेत मादी सांबराचा मृत्यू
Advertisement

बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्गावर वन्यजीवांचे मृत्युसत्र सुरूच;२० सांबरांसह १४० हून अधिक प्राण्यांचा बळी

नागपूर : बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्ग वन्यप्राण्यांसाठी धोकादायक ठरत असल्याचे वारंवार घडणाऱ्या अपघातांतून समोर येत आहे. या मार्गावर रेल्वेच्या धडकेत आतापर्यंत २० सांबरांसह १४० हून अधिक वन्यजीवांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी पहाटे चंद्रपूरजवळ मालगाडीची धडक बसल्याने आणखी एका मादी सांबराचा जीव गेला. या घटनांमुळे कावल-ताडोबा वन्यजीव भ्रमणमार्गातील प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

चंद्रपूर शहरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर जुनोना वनपरिक्षेत्रातील नियत कक्ष क्रमांक ४८२ मध्ये बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. चांदा फोर्टच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीची धडक मादी सांबराला बसली. धडकेमुळे सांबराचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची तीव्रता इतकी होती की, सांबराच्या शरीराचे अवशेष सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत विखुरले होते.

हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे यांच्या माहितीनुसार, या रेल्वेमार्गावरील अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सांबरांची संख्या २० झाली आहे. एकूण वन्यजीव मृत्यूंचा आकडा १४० च्या पुढे गेला आहे. चार दिवसांपूर्वी चिचपल्ली परिसरात रेल्वेची धडक बसल्याने बिबट्याच्या पिल्लाचाही मृत्यू झाला होता.

बल्लारशाह-गोंदिया रेल्वेमार्ग कावल ते ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाला जोडणाऱ्या वन्यजीव भ्रमणमार्गाच्या परिसरातून जातो. त्यामुळे या भागात वन्यप्राण्यांचा वावर असतो. रेल्वेमार्ग ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी संवेदनशील ठिकाणी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. मात्र, सातत्याने वन्यजीवांचा मृत्यू होत असल्याने विद्यमान उपाययोजनांच्या परिणामकारकतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Advertisement

दरम्यान, याच मार्गावर रानगव्यांचा कळप रेल्वे रुळ ओलांडत असताना लोको पायलट पप्पू शर्मा यांनी रेल्वे थांबवून वन्यजीवांना सुरक्षितपणे मार्ग ओलांडण्याची संधी दिली होती. या घटनेचे कौतुक झाले होते. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच सांबराचा मृत्यू झाल्याने वन्यजीव संरक्षणासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आवश्यकता पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.