नागपूर : पुण्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह कोलकात्याला नेत असलेली अॅम्ब्युलन्स नागपूर-जबलपूर महामार्गावर अपघातग्रस्त झाली. भारत पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या अॅम्ब्युलन्सला एका भरधाव वाहनाने जोरदार धडक दिल्याने ती थेट सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत चालक आणि मृत व्यक्तीच्या नातेवाइकाचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात कन्हाई बिस्वास यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मृतदेह कोलकात्याला घेऊन जाण्यासाठी अॅम्ब्युलन्समधून प्रवास सुरू होता. मृताच्या मुलासह (अबीर बिस्वास) नातेवाईक पंकज बिस्वास आणि चालक शिवाजी खल्लू भांबुरे हे तिघे अॅम्ब्युलन्समध्ये होते.
मात्र, नागपूर-जबलपूर रस्त्यावर भारत पेट्रोल पंपाजवळ अचानक अॅम्ब्युलन्स बंद पडली. त्यामुळे ती रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली. दरम्यान, अबीर बिस्वास मेकॅनिकच्या शोधात रस्ता ओलांडत असताना, एक भरधाव अज्ञात वाहन आले आणि अॅम्ब्युलन्सला जोरात धडकले.
धडकेमुळे अॅम्ब्युलन्स सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात पंकज बिस्वास आणि चालक शिवाजी भांबुरे गंभीर जखमी झाले. दोघांनाही तातडीने नागपूर मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला.
ही दुर्घटना अत्यंत वेदनादायक ठरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.