नागपूर : सीताबर्डी बुधवारी रात्री परिसरात संविधान चौकात भीषण अपघात झाला. वेगाने आलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने ५७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला, तर तिचे पती किरकोळ जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी भोजराज जगन्नाथ भुते (५८, रा. पाटणसावंगी) हे पत्नी वनिता यांच्यासह रुग्णालयातून तपासणी करून आणि कपड्यांच्या दुकानासाठी लागणाऱ्या वस्तू घेऊन घरी परतत होते. रात्री सुमारे आठ वाजताच्या सुमारास त्यांची दुचाकी (क्र. MH-40 SR 21) संविधान चौकातून जात असताना मागून भरधाव ट्रक (क्र. RJ-14 GT 6476) ने त्यांना जोरदार धडक दिली.
या धडकेत भोजराज रस्त्यावर फेकले गेले आणि किरकोळ जखमी झाले. मात्र ट्रकचे चाक वनिता भुते यांच्या अंगावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. तत्काळ त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी पोलिसांनी फरार ट्रकचालकाविरोधात भा.दं.सं. कलम २८१, १०६(१), १२५(अ) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १८५ व १८७ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून आरोपी चालकाचा शोध सुरू आहे.