Published On : Sat, Dec 7th, 2019

संविधानाने दिलेल्या हक्कासोबत आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा बाळगावी – डॉ. नितीन राऊत

महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

नागपूर: भारतीय संविधानाने सर्व धर्माच्या नागरिकांना समान अधिकार दिले आहेत. संविधानाने दिलेल्या हक्कासोबतच प्रत्येकाने आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा बाळगावी, असे प्रतिपादन मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

लोणारा येथील सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसी येथे आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. नितीन राऊत बोलत होते.

यावेळी माजी मंत्री अनिस अहमद, डॉ. एस.एम. राजन, सादीक कुरेशी, समन्वयक श्रीमती आयेशा अंसारी आदी उपस्थित होते.

डॉ. नितीन राऊत म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार मिळाला आहे. या संविधानाचे रक्षण आणि सन्मान करण्याचे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. भारतीय संविधानामुळेच जगामध्ये सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून आपली ओळख आहे. संविधानाने समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचा मुलभूत अधिकार प्रदान केला आहे. घटनेने भारतीय नागरिकाला अकरा मुलभूत अधिकार दिले आहेत. त्यामध्ये शिक्षणाच्या अधिकाराचा समावेश अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे. विद्यार्थ्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये आपल्या जीवनात आत्मसात करावी. जेणेकरुन विद्यार्थी दशेपासूनच संविधानाचे महत्त्व व संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डॉ. नितीन राऊत यांची दीक्षाभूमीला भेट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तेथील बौध्द स्तूपाच्या आतील तथागत गौतम बुध्द यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करुन सामुहिकरित्या बौध्द वंदना घेण्यात आली.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, सुधीर फुलझेले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

दीक्षाभूमी येथून निघून डॉ. नितीन राऊत यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. संविधान चौक येथे ऑल इंडिया समता सैनिक दलाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रीमती डॉ. सारिका खटाडे, डॉ. वासुदेव टोंगसे तसेच परिचारीका चमू उपस्थित होते.