Published On : Sat, Dec 7th, 2019

विद्यार्थ्यांसाठी त्वरित रोजगार मिळणारे अभ्यासक्रम राबवा – रविंद्र ठाकरे

Advertisement

नागपूर : कौशल्य विकास योजनेअंतर्गत जे अभ्यासक्रम सुरु आहेत त्यामध्ये उद्योग जगामध्ये आवश्यक असणाऱ्या नवीन तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम राबवा. उद्योगांना ज्या कौशल्याची गरज आहे ते गुण विद्यार्थ्यांमध्ये असल्यास त्वरित रोजगार प्राप्त होवू शकतो. गरज आणि पुरवठा यांचे प्रमाण योग्य राहिल्यास उद्योजकांना तसेच विद्यार्थी दोघांनाही फायदा होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केले.

जिल्हा उद्योग मित्र समिती व उद्योगात स्थानिक लोकांना रोजगार मिळेल या बाबतची सभा जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली छत्रपती सभागृहात, जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतीच संपन्न झाली.

यावेळी सचिव सचिन जैन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपअभियंता दिलीप जोगावे, आर.एस. बोराडे, एस. तिडके व जिल्हा उद्योग मित्र समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

औद्योगिक क्षेत्रातील समस्येवर मागील सभेत झालेल्या निर्णयावर तसेच प्रलंबित असलेल्या कामांवर यावेळी लक्ष केंद्रित करण्यात आले असून ही कामे तात्काळ सुरु करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी निर्देश दिलेत.

कळमेश्वर औद्योगिक क्षेत्रास मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतची अद्ययावत माहिती प्राप्त करुन कामांचा आढावा घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. तसेच कळमेश्वर औद्योगिक क्षेत्रात पाणीपुरवठा सुरु झाला असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. भिवापूर इंडस्ट्रियल असोसिएशन मध्ये विद्युत पुरवठा पुरविणे, एमआयडीसी हिंगणा व वाडी, बुटीबोरी औद्योगिक क्षेत्र येथील कामांच्या झालेल्या प्रगतीची माहिती घेवून सादर करण्याच्या सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्यात.

विकास आराखडा, एमआयडीसी क्षेत्रात होणाऱ्या प्रदूषणामुळे उद् भवणाऱ्या समस्या, मिहान औद्योगिक क्षेत्रात मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे, हिंगणा औद्योगिक क्षेत्रात सांडपाणी वाहिनी देखभाल, हिंगणा औद्योगिक क्षेत्रात विस्तारीकरणासाठी भूखंड उपलब्ध करुन देण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

एमआयडीसीच्या वतीने भूखंड हस्तांतरण करण्यासाठी 40 टक्के बांधकाम करण्याची अट शिथिल करण्यायाबाबत एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पुढील बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी अधिकाऱ्यांना दिले. एमआयडीसीद्वारा देखभाल दरवाढ, भिवापूर औद्योगिक क्षेत्रात नगरपंचायद्वारा कर वसुली याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.