Published On : Sat, Dec 7th, 2019

झाशी राणी चौकात २९ उपद्रवींवर कारवाई

Advertisement

धरमपेठ, धंतोली व मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाची संयुक्त कामगिरी

नागपूर : शहरातील झाशी राणी चौक सीताबर्डी येथे अस्वच्छता पसरवून शहर विद्रुप करणा-या २९ उपद्रवींवर शुक्रवारी (ता.६) मनपा उपद्रव शोध पथकाने कारवाई केली. धरमपेठ, धंतोली व मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे शुक्रवारी (ता.६) सीताबर्डी येथील झाशी राणी चौक, मोरभवन बस स्थानक येथे थुंकणारे व कचरा टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

मनपा आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या निर्देशानुसार स्वच्छ भारतचे नोडल अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, धंतोली व मंगळवारी झोनच्या पथकाकडून संयुक्तरित्या सीताबर्डी परिसरात उपद्रवींविरोधात कारवाईची धडक मोहिम राबविण्यात आली. तिन्ही झोनच्या पथकातील ४ कर्मचारी असे एकूण १२ कर्मचा-यांनी परिसरात विविध भागात उपद्रव करून शहर विद्रुप करणा-यांवर दंड थोठावला.

झाशी राणी चौक, मोरभवन परिसर तसेच सिग्नलवर थुंकणा-या १६ जणांवर कारवाई करीत उपद्रव शोध पथकाद्वारे ३२०० रुपये दंड वसूल करण्यात आले. तर खर्रा खाउन पॉलिथिन टाकून अस्वच्छता पसरविणा-या १३ जणांवर कारवाई करीत १३०० रुपये असे एकूण २९ जणांवर कारवाई करून ४५०० रुपये दंड वसूल करण्यात आले आहे.

पुष्पगुच्छांसाठी प्लॉस्टिकचा वापर करणा-यांना तंबी

फुल विक्रेत्यांकडून तयार करण्यात येणा-या पुष्पगुच्छांना प्लॉस्टिकचे आवरण लावले जाते. प्लॉस्टिक निर्मूलन अभियाना अंतर्गत सिंगल यूज प्लॉस्टिकचा वापर प्रतिबंधीत असल्याने पुष्पगुच्छांसाठी लावण्यात येणारे प्लॉस्टिकही प्रतिबंधीत आहे. त्यामुळे पुष्पगुच्छाला यापुढे प्लॉस्टिक लावण्यात येउ नये. यापुढे पुष्पगुच्छांसाठी प्लॉस्टिकचा वापर निदर्शनास आल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी सक्त ताकीद फुल तसेच पुष्पगुच्छ विक्रेत्यांना उपद्रव शोध पथकाद्वारे देण्यात आली आहे.

शहरातील सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा करणे हे सर्व आपल्या सवयीचा भाग झालेले आहे. त्यामुळे आपल्या सवयी बदलणे गरजेचे आहे. आपले शहर स्वच्छ, सुंदर होताना आपली मानसिकता बदलून चांगली शिस्त लागणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने मनपाचे उपद्रव शोध पथक कार्य करीत आहे. नागरिकांनी आपले शहर स्वच्छ, सुंदर ठेवणे हे आपले कर्तव्य आहे, ही बाब लक्षात ठेवून आपल्यामुळे कुठेही शहरात अस्वच्छता पसरू नये याची काळजी घ्यावी, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.