
नागपूर :नागपूर शहरात हनीट्रॅपच्या माध्यमातून नागरिकांना अडकवून कोट्यवधींची खंडणी उकळणाऱ्या टोळीवर गुन्हेशाखा व घरफोडी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ७ पुरुष आरोपींसह ४ महिला आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एका ६२ वर्षीय सुज्ञ नागरिकाकडून खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
दिनांक ०५ सप्टेंबर २०२५ ते १८ डिसेंबर २०२५ या कालावधीत तहसिल पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या फिर्यादीस हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आले. खाजगी चित्रीकरण करून ते सार्वजनिक करण्याची धमकी देत आरोपींनी फिर्यादीकडून ऑनलाईन व रोख स्वरूपात १ लाख ७८ हजार रुपये उकळले. त्यानंतर तब्बल २ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडीअंती ६० लाख रुपये देण्याचे ठरले होते.
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
अश्विन (वय ३९, रा. अजनी, नागपूर)
नितीन (वय ३८, रा. अजनी, नागपूर)
कुणाल (वय ४२, रा. अजनी, नागपूर)
रितेश उर्फ पप्पु (वय ४१, रा. हुडकेश्वर, नागपूर)
आशिष (वय ३६, रा. गोंदिया)
अविनाश वय ३५, रा. जि. गोंदिया)
रविकांत (रा. नागपूर)
यांच्यासह ४ महिला आरोपींचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सहा. पोलीस आयुक्त श्री. अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा–घरफोडी विरोधी पथकाने सापळा रचत दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी एका हॉटेलमध्ये कारवाई केली. आरोपी क्र. १ ते ३ यांनी पूर्ण ६० लाख रुपयांची मागणी करताच पोलिसांनी त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. चौकशीनंतर उर्वरित आरोपींनाही अटक करण्यात आली.
कारवाईदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम व विविध कंपनीचे मोबाईल असा एकूण १ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे तहसिल येथे कलम ३०८(२), ६१(२), ३(५) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना पुढील तपासासाठी तहसिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, सह. पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन) राहुल माकणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.








