Published On : Mon, Oct 1st, 2018

इंडियन ज्वेलर्स विकचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

मुंबई: ज्वेलरीच्या व्यवसायात महिला उद्योजकांना अधिक संधी देऊन त्यांचा या उद्योगात सहभाग वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. या क्षेत्रातील रोजगार वाढीसाठी प्रशिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास प्रशिक्षण संस्था असणे आवश्यक असल्याचे मत राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडद्वारा दि. 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत ‘इंडियन ज्वेलर्स विक’ हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार राज पुरोहित, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहित काम्बोज, उपाध्यक्ष पृथ्वीराज कोठारी, असोसिएशनचे सदस्य, जेम्स आणि ज्वेलरी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

राज्यपाल श्री.राव म्हणाले, मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे. चित्रनगरीमुळे मुंबई देशाची फिल्म राजधानीही आहे. आता लवकरच मुंबईला भारतातील जेम्स आणि ज्वेलरीची राजधानी म्हणूनही ओळखली जाईल, असा विश्वास राज्यपालांनी व्यक्त केला. या सात दिवस चालणाऱ्या उत्सवाचा फायदा खरेदीदारांना तसेच या व्यवसायातील लोकांनाही होईल.

या महोत्सवामुळे एक नवी सुरुवात झाली असून किरकोळ विक्रेते, सामान्य खरेदीदार एकाच व्यासपीठावर आणले गेले आहेत. याचप्रमाणे नियमीत व्यवसायासाठी एक स्वतंत्र हब तयार करुन सर्व व्यावसायिकांना एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण काम या संघटनेमार्फत करण्यात यावे, असे आवाहनही राज्यपालांनी यावेळी केले. आठवडाभर चालणाऱ्या या महोत्सवात हजारोच्या संख्येने लोक भेट देतील, तेव्हा या महोत्सवातून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) माध्यमातून राज्याचेही उत्पन्न वाढणार आहे. दुबई शॉपिंग फेस्टिवलच्या धर्तीवर मुंबई शॉपिंग फेस्टिवल आयोजित केल्यास जगभरातील ग्राहकांना आकर्षित करता येईल, असेही राज्यपालांनी सांगितले.

सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच नियमित मासिक गुंतवणूक करून ग्राहकांनी या क्षेत्रात गुंतवणूक वाढवावी यासाठीही इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने प्रोत्साहित केले पाहिजे. भारतीय ज्वेलर्सनी जागतिक दर्जाची ज्वेलरी बनवून विश्वास, सौंदर्य आणि परवडण्यासारखे दागिने यासाठी एक ब्रँड म्हणून पुढे यावे. नैतिकतेने व्यवसाय करून जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवावा, असेही राज्यपालांनी यावेळी सांगितले.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही 99 वर्षं जुनी संस्था आहे. देशातील सोन्याचे दर ठरविण्यात या संघटनेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सुमारे 150 दुकानदार आणि 12 हजार व्यापारी सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनातून होणाऱ्या विक्रीतून राज्याला 500 कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मिळणे अपेक्षित आहे.

यावेळी आमदार राज पुरोहित, श्री.मोहित कम्बोज यांचीही भाषणे झाली. यावेळी या महोत्सवाच्या लोगोचे तसेच एका पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.