Published On : Mon, Oct 1st, 2018

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानासाठी रेकीट बेनकायझेर कंपनीतर्फे 13 कोटींची मदत

मुंबई : सामाजिक दायित्त्व उपक्रमाच्या (सीएसआर) माध्यमातून महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानासाठी (महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाऊंडेशन) रेकीट बेनकायझेर कंपनीतर्फे 13 कोटींची मदत देण्यात आली आहे. आज सह्याद्री अतिथीगृह येथे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राकेश कपूर यांनी 13 कोटींचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.

यावेळी अभियानाच्या कार्यकारी संचालक श्वेता शालिनी, कंपनीचे संचालक रवी भटनागर, परराष्ट्र व्यवहार संचालक पॅटी ओहेर आदी उपस्थित होते.

एक हजार गावांचा शाश्वत सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान राबविण्यात येत आहे. राज्यातील खाजगी आणि सार्वजनिक संस्था, उद्योगसमूह तसेच वित्तीय संस्था यांच्या सामाजिक दायित्त्व उपक्रमाच्या (सीएसआर) माध्यमातून ग्रामीण भागातील एक हजार गावांमध्ये परिवर्तन घडवून आणणे आणि ही गावे शाश्वत विकासासाठी सक्षम करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून राबविण्यात येत आहे. राज्यातील विविध सामाजिक आव्हानांना तोंड देणाऱ्या एक हजार खेड्यांचे रुपांतर आदर्श गावांमध्ये करण्याचे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.