गडचिरोली : जिल्हातील प्रत्येक घरापर्यंत पोहचून नागरिकांची कोरोनाबाबत तपासणी करणेकरीता सुरू झालेल्या “माझे कुटुंब माझी जबाबदारी” मोहिमेंतर्गत गृहभेटींना सुरूवात झाली आहे. याबाबत गावस्तरावर तसेच शहरातील विविध ठिकाणी आजपासून प्रत्यक्ष पथकांनी गृहभेटी देण्यास सुरूवात केली. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे. पूर्वनिदान झाले तर मृत्यूचे प्रमाणही कमी होणार आहे. प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणे या मोहिमेमुळे शक्य होणार आहे. नागरिकांनी आपल्या घरी तपासणी व माहिती, सूचना आदींसाठी येणा-या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहनही आज मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांनी केले.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्वंयशिस्त महत्त्वाची असल्याचे सांगून मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाले, स्वंयशिस्त पाळली तर आपण कोरोनाला रोखू शकतो, कोरोनाशी लढण्यापेक्षा कोरोना होवूच नये यासाठी प्रत्येकाने दक्षता घेण्याची गरज आहे. रोगप्रतिकारशक्ती चांगले ठेवण्यासाठी प्रत्येकाने योग्य ती काळजी घ्यावी. प्रत्येकाने स्वत: सोबत इतरांच्याही आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे.