Published On : Mon, Sep 21st, 2020

रुग्णालय चालविण्यासाठी साई मंदीर ट्रस्टचा पुढाकार

कोव्हिडच्या संकटात मोलाची साथ

नागपूर : सेवा भावी कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे साई मंदीर ट्रस्ट, वर्धा रोड यांनी महानगरपालिकेचा इमामवाडा येथील आयसोलेशन हॉस्पीटल कोव्हिड-१९ च्या रुग्णांकरिता चालविण्याची जबाबदारी घेतली आहे. या रुग्णालयात ३२ खाटांची व्यवस्था असून सर्व बेडस्‍ला ऑक्सिजनची व्यवस्था आहे. साई मंदीर ट्रस्टतर्फे ५ बेडस्‍ वर व्हेंटिलेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. सध्या नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. शासकीय रुग्णालयात जागेची उपलब्धता कमी आहे. या कठिण प्रसंगी साई मंदीर ट्रस्टने नागरिकांना मोठा आधार ‍दिला आहे. रुग्णालयामध्ये कोरोना रुग्णांना बुधवार (२३ सप्टेंबर) पासून दाखल केले जाईल.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी आणि साई मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष श्री. ओमप्रकाश (मुन्ना) यादव, सचिव श्री.अविनाश शेगांवकर आणि माजी उपमहापौर व मंदीराचे ट्रस्टी डॉ. रविंद्र (छोटू) भोयर यांनी करारनाम्यावर स्वाक्षरी केली. या करारनाम्यानुसार साई मंदीर ट्रस्टच्यावतीने एम.डी. व भूलतज्ज्ञची व्यवस्था केली जाणार आहे. या व्यक्तिरिक्त रुग्णांना सकाळ/सायंकाळ नाश्ता, चहा आणि दोन वेळचे जेवण दिले जाईल.

मनपा तर्फे नर्स, आर.एम.ओ. आणि वॉर्डबॉय ची व्यवस्था केली जाईल. लॉकडाऊनच्या काळात साई मंदीर ट्रस्टतर्फे दररोज १० हजार लोकांना संपूर्ण जेवणाची व्यवस्था केली गेली होती. सतत ४१ ‍दिवस ४ लाख लोकांना जेवण पुरविण्यात आले. ट्रस्ट तर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ३१ लक्ष रुपयांची मदतही देण्यात आली. डॉ. भोयर यांनी सांगितले की, नागपूर नागरिक रुग्णालय आणि होमियोपॅथी कॉलेज सुद्धा चालविण्याची ट्रस्टची तयारी आहे. यासाठी एक प्रस्ताव विभागीय आयुक्तांना दिले आहे.