बिडी कामगार गाळे धारकांना मालकी हक्क मिळणार : अॅड. सुलेखा कुंभारे
नागपूर: बिडी कामगारांचे प्रेरणास्थान असलेले दादासाहेब कुंभारे यांच्या प्रयत्नांनी कामठी येथे बिडी कामगार वसाहतीकरिता 11.43 हेक्टर जागा शासनाकडून मिळविण्यात आली होती. राज्यात बिडी कामगारांना घरकुलासाठी जागेचा लाभ फक्त सोलापूर आणि कामठी येथेच मिळाला. कामठीच्या ड्रॅगन पॅलेस टेंपल परिसरातील एमटीडीसी सभागृहात रविवारी महाराष्ट्र राज्य बिडी मजदूर संघ कामठी शाखेच्या वतीने बिडी कामागारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात अॅड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते कुंभारे कॉलनीतील बिडी कामगारांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आले.
या मेळाव्याला ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. याप्रसंगी याप्रसंगी म्हाडाचे मुख्याधिकारी भीमनवार, मुद्रांक जिल्हाधिकारी उघडे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार अरविंद हिंगे, मनपा नगरसेविका वंदना भगत, सावला, सिंगाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते.
शासनाकडून मिळालेल्या 11.43 हेक्टर जागेवर दादासाहेब कुंभारे बिडी कामगार कॉलोनी कामठी अत्यल्प उत्पन्न गट 627 घरे बिडी कामगारांकरिता बांधण्यात आली होती. पण अजूनपर्यंत म्हाडातर्फे बांधण्यात आलेली घरी बिडी कामगारांच्या नावाने करण्यात आली नव्हती. या संदर्भात अॅड. सुलेखाताई कुंभारे यांनी शासनाकडे वारंवार बैठकी घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे यशस्वी प्रयत्न केले. घरकुल धारकांना मालकी हक्क प्राप्त व्हावेत या उद्देशाने आज बिडी कामगारांचा पट्टेवाटप मेळावा आयोजित करण्यात आला. याप्रसंगी सहाशेवर बिडी कामगार घरकुल धारकांना अॅड. सुलेखाताई कुंभारे यांच्या हस्ते घरकुल पट्टे वाटप करण्यात आले.
या बिडी कामगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र बिडी मजदूर संघ शाखा कामठीचे सर्व अधिकारी कर्मचारी, बरिएम जिल्हाध्यक्ष अजय कदम, तालुकाध्यक्ष उदास बन्सोडे, अशोक नगरारे, सुषमा डोंगरे, शहराध्यक्ष दिपंकर गणवीर, विष्णू ठवरे, नियाज कुरेशी, अशफाक कुरेशी आदींनी प्रयत्न केले.