कासारगोड (केरळ) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी के. प्रभाकर भट यांनी वाद निर्माण करणारे विधान करत हिंदूंना शस्त्रसज्ज राहण्याचा सल्ला दिला आहे.
वरकाडी (मंजेश्वर) येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले की, “हिंदू समाजाने आता केवळ सहन करत बसू नये, तर स्वसंरक्षणासाठी घरात तलवार आणि चाकू ठेवावे.
पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यात हिंदू यात्रेकरूंना लक्ष्य केलं गेल्याचा आरोप करत, भट म्हणाले, “त्या वेळी जर हिंदूंकडे तलवार असती, तर परिस्थिती वेगळी असती. प्रत्येक हिंदूने आपल्याकडे रक्षणासाठी शस्त्र असणे आवश्यक आहे.”
महिलांनाही त्यांनी हातातील पर्समध्ये छोटा चाकू ठेवण्याचा सल्ला दिला, “सहा इंची चाकूसाठी कोणताही कायदेशीर परवाना लागत नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
हल्लेखोरापासून घाबरू नका, प्रत्युत्तर द्या-
हल्ल्याच्या प्रसंगी हात जोडून विनंती न करता, हल्लेखोरास चाकू दाखवा, तेवढंच पुरेसं आहे, असा सल्ला त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, पूर्वी हिंदू समाज भयभीत होऊन पळ काढायचा, पण आता तो काळ गेला आहे. संघर्षाची तयारी ठेवा.
वादळ उठण्याची शक्यता, पोलीस शांत-
भट यांच्या या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ माजण्याची शक्यता असून, सध्या पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र पहलगाम घटनेनंतर निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य आले असल्याचे बोलले जात आहे.