
नागपूर : धार्मिक स्थळांवरील वाढत्या ध्वनीप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कठोर भूमिका घेतली आहे. विनापरवानगी लावलेले भोंगे आणि लाऊडस्पीकर सात दिवसांच्या आत हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून या आदेशाची अंमलबजावणी नागपूर शहरातील सर्व धार्मिक स्थळांवर करण्यात येणार आहे. यासाठी पोलिस प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायालयाने स्पष्ट केले आहे की हा नियम मंदिर, बुद्ध विहार, मशीद, गुरुद्वारा यांसह सर्व धर्मांच्या धार्मिक स्थळांवर समानपणे लागू राहील. विशेषतः नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश
सार्वजनिक ठिकाणी आवाज पोहोचवणारे विनापरवानगी भोंगे व लाऊडस्पीकर तात्काळ काढून टाकावेत.
परवानगी असलेले लाऊडस्पीकर धार्मिक स्थळाच्या आत आणि जमिनीपासून किमान १५ फूट उंचीवर बसवणे बंधनकारक असेल.
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित धार्मिक स्थळाचे अध्यक्ष आणि सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
या आदेशानंतर नागपूर शहरातील विविध धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरची तपासणी आणि परवानगी प्रक्रियेवर प्रशासनाची विशेष नजर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.








