Published On : Thu, Jul 11th, 2019

एमपीएससीकडून निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्तीस विलंब का ?: विजय वडेट्टीवार

Advertisement

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या सहायक रासायनिक विश्लेषक पदासाठी पात्र झालेल्या ८२ उमेदवारांना नियुक्ती देण्यास विलंब का होत आहे?, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विचारला आहे.

एमपीएससी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. सहायक रासायनिक विश्लेषक पदाकरता परीक्षा व मुलाखत पार पडून आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. १२ एप्रिल २०१७ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीरात प्रसिद्ध केली, त्यानंतर ७ आक्टोबर २०१७ रोजी मुंबई येथे लेखी चाळणी परीक्षा दिली आणि उत्तिर्ण उमेदवारांच्या मुलाखती १८ ते २२ डिसेंबर २०१७ रोजी होऊन अंतिम निकाल ३१ आक्टोबर २०१८ रोजी लागला. यातून ८२ उमेदवारांची अंतिम निवड होऊन आयोगाकडून १२ नोव्हेंबर २०१८ रोजी अधिकृत शिफारस पत्र देण्यात आले.

एक महिन्यात नियुक्ती पत्र देण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले होते. नवीन नोकरीच्या आशेने हाती असलेली नोकरीही सोडली. आता नियुक्तीस विलंब होत असल्याने हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागण्याची वेळ आलेली आहे. असे या उमेदवारांनी वडेट्टीवार यांच्या निदर्शनास आणून दिले आणि न्याय देण्याची विनंती केली.

बेरोजगारीमुळे तरुणवर्गाचे हाल होत आहेत. सरकार फक्त निवडणुकीच्या तोंडावर नोकर भरती, शिक्षक भरती, मेगा भरतीच्या घोषणा करते मात्र प्रत्यक्षात नोकरी भरतीची प्रक्रियाही पार पाडत नाही. राज्यातील बेरोजागार तरुणांना नोकर भरतीच्या नावाखाली फक्त गाजर दाखवण्याचे काम राज्यातील भाजप शिवसेना सरकारने मागली पाच वर्षात केले आहे. केंद्रातील मोदी सरकारनेही दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याच्या वल्गणा करुन तरुण वर्गाची फसवणूक केली आहे. राज्यातील फडणवीस सरकारनेही मागील साडे चार वर्षात तरुण वर्गाची निराशाच केलेली आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

एमपीएससीकडूनही तरुण वर्गाची वारंवार निराशा केली जात आहे. मोठ्या प्रमाणात नोकर भरती केली जात नाही. पण ज्या काही जागांसाठी परीक्षा घेऊन सर्व निवड प्रक्रिया पार पाडलेली आहे, त्यांनाही नियुक्तीसाठी ताटकळत बसवले जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आणि तरुण बेरोजगार वर्गाची थट्टा करण्याचा प्रकार असल्याचे विरोधी पक्षनेते म्हणाले.