Published On : Mon, Jul 18th, 2022
By Nagpur Today Nagpur News

पूरग्रस्तांना मदत करा, खचलेला पूल पुन्हा बांधा माजीमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Advertisement

काटोलच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर

नागपूर : पुरात शेतकरी, सामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यांना तत्काळ मदत मिळवून द्या, अशा सूचना आज माजी उर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपविभागीय अधिकारी, तहसिलदार व संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. पूरग्रस्त पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी काटोल तालुक्यातील पूल खचल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला फोनवरून धारेवर धरले.

Gold Rate
28 April 2025
Gold 24 KT 95,700 /-
Gold 22 KT 89,000 /-
Silver / Kg 97,200 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

माजीमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल, रविवारपासून जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा सुरू केला. आज दुसऱ्या दिवशी त्यांनी काटोल तालुक्यातील पांजरा काठे, रिधोरा गावाला भेट दिली. नरखेड तालुक्यातील बानोर व सावनेर तालुक्यातील खुबाळा येथे पूरपरिस्थितीची पाहणी केली. काटोल तालुक्यातील पांजरा काठे येथे पूरपरिस्थितीची पाहणी करताना नवीन पूल सहा महिन्यात वाहून गेल्याचे पुढे आले. त्यांनी तत्काळ गावकऱ्यांच्या समक्ष संबंधित अधिकाऱ्यांना फोनवरूनच धारेवर धरले.

हा पूल तत्काळ दुरुस्त करण्याच्या तसेच उंची वाढविण्याच्या सूचना केल्या. पूरपरिस्थिती पाहणीनंतर काटोलचे उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली. नरखेड तालुक्यातील बानोर या पूरग्रस्त गावाला भेट दिली.

येथील गावाला जोडणारा मुख्य पुल पावसाने वाहून गेला. त्यामुळे गावकरी व शेतकऱ्याचे खूप नुकसान झाले. येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा ऐकून घेतली. येथील शेतकऱ्यांना धीर देत शक्य ती मदत मिळवून देण्याबाबत आश्वस्त केले. सावनेर तालुक्यातील खुबाळा येथे पूरपरिस्थितीची पाहणी केली. येथील परिस्थितीवर उपविभागीय अधिकारी सावनेर यांच्याशी चर्चा केली. नागरिकांना शासनामार्फत जास्तीत जास्त मदत देण्याबाबत सूचना केल्या. १२ जुलैला नांदागोमुखजवळ ब्राह्मणमारी नदीचा पूल ओलांडत असताना स्कॉर्पिओ पुरात वाहून गेली. या दुर्दैवी घटनेत नांदागोमुख येथील सुरेश ढोके यांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला. त्यांनी सुरेश ढोके यांच्या घरी जाऊन सांत्वना भेट घेतली.

Advertisement
Advertisement