Published On : Sat, Dec 15th, 2018

क्रीडा स्पर्धांमुळे खेळ भावना वृद्धिंगत होण्यास मदत : नागेश सहारे

मनपाच्या शिक्षण सप्ताहाचे उद्‌घाटन : सांघिक खेळांनी गाजविला दिवस

नागपूर : विद्यार्थी दशेत खेळ महत्त्वाचे आहे. खेळांमुळे शारीरिक व्यायामासोबतच बौद्धिक विकासालाही हातभार लागतो. मनपाच्या शिक्षण सप्ताहादरम्यान होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमुळे खेळ भावना वृद्धिंगत होण्यास मदत होते, असे प्रतिपादन क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी केले.

नागपूर महानगरपालिका शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने बालक दिनाचे औचित्य साधून १४ ते २२ डिसेंबर दरम्यान शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात पाच झोनमध्ये एकाचवेळी सप्ताहाचा उद्‌घाटन कार्यक्रम पार पडला. हनुमाननगर आणि धंतोली झोनअंतर्गत असलेल्या शाळांच्या स्पर्धा हनुमाननगर येथील लाल बहादुर शास्त्री शाळेत आयोजित करण्यात आल्या. येथील उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी शिक्षण समितीच्या उपसभापती भारती बुंडे, सहायक शिक्षणाधिकारी प्रीती बंडेवार, क्रीडा अधिकारी नरेश सवाईथूल, शाळा निरिक्षक सुषमा बावनकर, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी, मुख्याध्यापक संजय पुंडे, क्रीडा शिक्षक मंगला डहारे, सुनील डोईफोडे, स्नेहा भोतमांगे, ज्योती कोहळे, कृष्णा उजवणे उपस्थित होते.

पुढे बोलताना क्रीडा सभापती नागेश सहारे म्हणाले, महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी खेळामध्ये मागे नाहीत. अनेक स्पर्धांमध्ये येथील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुण विकसित होण्यासाठी अशा आयोजनाचा मोठा हातभार लागतो. यावर्षीचे आयोजन हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अधिक उत्तम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण समितीच्या उपसभापती भारती बुंडे यांनीही यावेळी क्रीडा स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सलामीला कबड्डीचा सामना घेण्यात आला. प्रमुख पाहुण्यांना खेळाडूंची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर स्पर्धांना सुरुवात झाली. हनुमान नगर झोनमध्ये सुरू झालेल्या स्पर्धेत वर्ग १ ते ४ या गटातील पाच शाळा तर वर्ग ५ ते ८ या गटातील सात शाळा सहभागी झाल्या असल्याची माहिती प्रास्ताविकातून देण्यात आली. संचालन क्रीडा शिक्षिका मंगला डहारे यांनी केले.

शिक्षण सप्ताहांतर्गत एकाच वेळी पाच झोनमध्ये स्पर्धा सुरू आहेत. एका ठिकाणी दोन-दोन झोनअंतर्ग़त असलेल्या शाळांचा सहभाग आहे. १४ ते १८ दरम्यान झोन स्तरावर स्पर्धा होतील. यातील विजेत्यांना केंद्रीय स्पर्धेत प्रवेश मिळेल. केंद्रीय स्पर्धा १९ ते २१ डिसेंबर दरम्यान यशवंत स्टेडियम येथे होतील. शिक्षण सप्ताहाचा समारोप आणि बक्षीस वितरण २२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कविवर्य सुरेश भट सभागृहात होईल.

शिक्षणासह क्रीडा गुणांचा विकास व्हावा : दिलीप दिवे
शाळांमध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. अभ्यासासह विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढीस लागावे हा शिक्षणाचा उद्देश असतो. मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांचाही शिक्षणासह क्रीडा गुणांचा विकास व्‍हावा, यासाठी मनपाच्या शिक्षण सप्ताहामध्ये क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असल्याचे मनोगत मनपाचे शिक्षण विशेष समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी व्यक्त केले.

विवेकानंद नगर येथील बुद्ध विहार मैदानात आयोजित विविध क्रीडा स्पर्धांचे शिक्षण विशेष समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, डॉ. श्रीराम आगलावे, केंद्र प्रमुख संध्या इंगळे, शाळा निरीक्षक संजय दिघोरे, समन्वयक रामकृष्ण गाढवे, मुख्याध्यापिका रजनी वाघाडे यांच्यासह लक्ष्मी नगर व धरमपेठ झोनमधील सर्व मनपा शाळांचे शारीरिक शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना शिक्षण विशेष समिती सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, मनपा शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आहे. त्यांच्यातील कौशल्य पुढे येण्यासाठी त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. आज विविध माध्यमातून क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून त्यातून पुढे आलेले प्रतिभावंत विद्यार्थी राज्यासह देशात आपल्या नागपूर महानगरपालिकेचे नाव लौकीक करीत आहेत, ही आपल्यासाठी गौरवशाली बाब आहे, असेही प्रा. दिलीप दिवे म्हणाले.

मनपा शाळेतील दीक्षित नेवारे राष्ट्रीय स्पर्धेमध्ये
नागपूर महानगरपालिकेच्या फुटाळा येथील प्रियदर्शनी उच्च प्राथमिक शाळेतील दीक्षित नेवारे या विद्यार्थ्याची राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली. त्याच्या निवडीबद्दल शाळेचे मुख्याध्यापक विष्णू जाधव यांचे शिक्षण विशेष समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी पुष्पगुच्छ देउन अभिनंदन केले. १५ ते १९ डिसेंबरला उत्तराखंड येथील रुद्रपूर येथे होणा-या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये दीक्षित महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. याशिवाय वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेतील चार विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय सायकल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. २९ डिसेंबरला बारामती येथे राज्यस्तरीय शालेय क्रीडा सपर्धा होणार आहेत. या स्पर्धेमध्ये शिवानी मिश्रा, रजनी रावत, संजना ठाकुर व सूर्यकांत तिवारी हे विद्यार्थी राज्यस्तरावर नागपूर महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. वाल्मिकी नगर शाळेचे क्रीडा शिक्षक नितीन भोळे यांचेही शिक्षण विशेष समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी यावेळी अभिनंदन केले.