Published On : Sat, Dec 15th, 2018

‘पोटोबा’देणार बचत गटांच्या महिलांना रोजगार

Advertisement

महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत सभापती प्रगती पाटील यांची माहिती

नागपूर : नागपूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने ‘पोटोबा’ ही संकल्पना मांडण्यात आली. संपूर्णपणे बांबूपासून तयार करण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या स्टॉल्सची निर्मिती करून नागपूर शहरातील ३८ प्रभागात ते देण्यात येणार आहे. या माध्यमातून ३८ बचत गटांना सामूहिक रोजगार उपलब्ध होणार आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती प्रगती पाटील यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणारा हा प्रकल्प लवकरच प्रत्यक्षात उतरणार असल्याची माहिती खुद्द सभापती प्रगती पाटील यांनी दिली. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सभापती प्रगती पाटील,उपसभापती विशाखा बांते, सदस्या दिव्या धुरडे, सरीता कावरे, मनिषा अतकरे, मनपाच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे उपस्थित होत्या.

सदर बैठकीत या प्रकल्पावर चर्चा करण्यात आली. महिलांच्या हाताला चव असते. याच महिलांच्या हक्काचे फुड स्टॉल संपूर्ण नागपुरात उभारण्यासाठी महिला व बालकल्याण समितीने पुढाकार घेतला आहे. संपूर्ण ३८ प्रभागात हे फुड स्टॉल निर्माण करण्यात येणार आहे. ‘चलो चले प्रगती की ओर’ आणि ‘कशासाठी?…पोटासाठी!’ अशी टॅगलाईन या फुड स्टॉलसाठी राहणार असून ‘पोटोबा’ नावाने संपूर्ण नागपुरात याची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. अर्थातच काही दिवसातच ‘पोटोबा’ महिला बचत गटांनी सुरू केलेल्या फुड स्टॉल्सचा ‘ब्रॅण्ड’ म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास सभापती प्रगती पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

सदर बैठकीत जानेवारी २०१९ मध्ये आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. आयोजनासंदर्भात यावेळी चर्चा झाली. सदर बैठकीत ई-रिक्षा वाटपासंदर्भातही चर्चा करण्यात आली. समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून ई-रिक्षाचे वाटप करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले असून लवकरच लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार असल्याचे सभापती प्रगती पाटील यांनी सांगितले. बैठकीला समाजकल्याण विभागाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

‘त्या’ बालिकेला मिळणार योजनेचा लाभ
मेट्रोच्या बांधकामादरम्यान एका अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला तीन मुली असून त्यापैकी एक सहा महिन्यांची आहे. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून त्या बालिकेला लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत लाभ देण्याचा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.