मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी झाला होता; मात्र पुढील आठवडाभर हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचे सत्र तीव्र होणार आहे.
विदर्भात अतिवृष्टीचा अंदाज-
मंगळवारी (२ सप्टेंबर) विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर आणि कोकणातील काही भागांत जोरदार सरी कोसळतील. मराठवाड्यातील नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
पुण्यासह आठ जिल्ह्यांना अलर्ट-
बुधवारी (३ सप्टेंबर) पावसाचा जोर आणखी वाढेल. पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली आणि जालना येथेही मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
गुरुवारी किनारपट्टी व घाटमाथ्यावर पावसाचा तडाखा-
गुरुवारी (४ सप्टेंबर) कोकण किनारपट्टी व पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर अधिक वाढेल. नाशिक, ठाणे, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावती येथेही मुसळधार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
हवामान खात्याचा इशारा-
राज्याच्या उर्वरित भागांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.