विदर्भात पावसाने धुमाकूळ घातल्याने नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी उपराजधानी नागपूरमध्ये जोरदार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचले असून, काही घरांमध्ये व रेल्वे स्थानकात पाणी घुसले. नरसाळा स्मशानभूमी परिसर, सक्करदरा, सोमवार पेठ, कळमना आणि दत्तात्रय नगरसारख्या भागांत नागरिक अडकले असून, प्रशासनाने बचाव कार्य सुरू केले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून नागपूरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. वाहतूक व्यवस्थाही पूर्णपणे कोलमडली असून, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा धोका लक्षात घेता हवामान विभागाने नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, बुधवार ९ जुलै रोजी अंगणवाड्यांपासून महाविद्यालयांपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व देवळी तालुक्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला असून, यशोदा नदी दुथडी भरून वाहत आहे. अलमडोह-अल्लीपूर व वर्धा-राळेगाव मार्ग पाण्याखाली गेले असून, प्रवास ठप्प झाला आहे. वर्ध्यालाही शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान, गोंदियाचा मध्य प्रदेशशी संपर्क तुटला असून, पूर्व विदर्भातील अनेक भागांमध्ये अजूनही अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पूरग्रस्त भागांमध्ये मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.