Published On : Wed, Jun 27th, 2018

नागपुरात पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांची सुटका

नागपूर: जून महिन्याच्या प्रारंभी एक दोन दिवस दर्शन देऊन लुप्त झालेल्या पर्जन्यराजाने आज सकाळपासून नागपुरात आपली दमदार हजेरी लावली. दोन दिवसांपासून नागपूर व विदर्भात कडक उन तापत होते. उन्हाळा जणू परत आला असावा असाच भास नागरिकांना होत होता.

कालपासून वातावरण थोडे ढगाळ झाल्याने लवकरच पाऊस बरसेल असा अंदाज वर्तविला जात होता. तो आज सकाळी खरा ठरवून पावसाने नागपुरात जोरदार आगमन केले.

जून महिन्याचा दुसरा पंधरवडा हा अक्षरश: कोरडा गेला असून, बळीराजासोबतच सामान्य नागरिकदेखील पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत होते. पेरणीयोग्य पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला नागपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. मात्र त्यानंतर सातत्याने वातावरण कोरडेच राहिले. विदर्भात पुढील ४८ तासात काही ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे.

कृषी विभागाने घेतलेल्या आढाव्यात १२.६४ टक्के पेरण्या पार पडल्या आहेत. रामटेक व नागपूर (शहर) पेरणीलाच सुरुवात झाली नाही. जून महिना संपत आला असताना पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतित आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता पावसाची प्रतीक्षा करावी. पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे नागपूर जिल्ह्याच्या कृषी हवामान सल्ला पत्रकात नमूद करण्यात आले आहे.