
नागपूर : शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. मुलीच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच, अवघ्या दहा दिवसांपूर्वी आईचा अपघाती मृत्यू झाल्याने आनंदाच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेचा तपशील –
पांचपावली पोलीस ठाणे हद्दीतील राणी दुर्गावती चौकात गुरुवारी दुपारी हा भीषण अपघात घडला. ४३ वर्षीय केसरबाई टुंडीलाल शरणागत यांना भरधाव मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचे पती टुंडीलाल शरणागत जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
कसा घडला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, दाम्पत्य दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास Bank of Baroda मधून पैसे काढून घरी परतत होते. त्यावेळी त्यांच्या दुचाकीने अचानक साथ सोडली. त्यामुळे पती दुचाकी ढकलत पुढे जात होते, तर केसरबाई त्यांच्या मागे पायी चालत होत्या.
याच दरम्यान, मागून वेगाने येणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांना धडक दिली. धडकेनंतर वाहन पुढे उभ्या असलेल्या दुसऱ्या गाडीवर जाऊन आदळले. या दोन वाहनांच्या मध्ये केसरबाई अडकल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
लग्नाआधीच घरावर दु:खाचा डोंगर-
मृत महिलेच्या मुलीचे लग्न अवघ्या १० दिवसांवर आले होते. त्यासाठीच दाम्पत्य पैसे काढून घरी परतत होते. मात्र या दुर्दैवी अपघातामुळे लग्नाच्या घरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांची माहिती :
पांचपावली पोलिस ठाण्याचे अधिकारी बाबुराव राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील आरोपी चालकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.








