नागपूर -महाराष्ट्र राज्यातील बारावी (HSC) परीक्षेचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) उद्या, 2 मे रोजी दुपारी 1 वाजता हा निकाल अधिकृतपणे जाहीर केला जाणार आहे. त्याआधी सकाळी 11 वाजता मंडळाची पत्रकार परिषद होणार असून त्यात निकालासंदर्भातील महत्त्वाची माहिती दिली जाईल.
यानंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने आपला निकाल पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना सीट नंबर आणि आईचे नाव टाकणे आवश्यक असणार आहे.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळे बारावीचा निकाल पुढील संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहे:
results.digilocker.gov.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
विद्यार्थ्यांना या संकेतस्थळांवर लॉगिन करून आपले गुण पाहता येतील तसेच त्याची प्रिंटही काढता येईल.
डिजिटल गुणपत्रिका आणि महाविद्यालयात निकाल निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना DigiLocker अॅपमध्ये डिजिटल गुणपत्रिका जतन करण्याची सुविधा उपलब्ध असेल. तसेच संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनाही एकत्रित निकाल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातूनही गुणपत्रिकेची प्रत मिळू शकते.
गुणपडताळणी आणि पुनर्मूल्यांकन प्रक्रिया ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांबाबत शंका असेल, त्यांच्यासाठी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायाप्रत आणि पुनर्मूल्यांकनाची सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे. 3 मे ते 17 मे 2026 या कालावधीत विद्यार्थी अर्ज करू शकतात.
पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. त्यानंतर पाच कामकाजाच्या दिवसांत संबंधित प्रक्रियेची पूर्तता करावी लागेल. शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI किंवा नेट बँकिंगद्वारे भरता येईल.
यंदा 14 लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला यावर्षी सुमारे 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे. निकालाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणपत्रिका डाउनलोड करता येणार आहे. पुढील शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ही गुणपत्रिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.








