Published On : Fri, Jun 21st, 2019

सुदृढ आरोग्यासाठी नियमीत योगसाधना करा : ना. नितीन गडकरी

विश्व योग दिनानिमित्त यशवंत स्टेडियमवर उसळली योगसाधकांची गर्दी

नागपूर: आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली तरी आपल्या आरोग्याची काळजी घेणे हे आपल्याच हातात आहे. अनेक वर्षांपूर्वी जनार्दन स्वामींनी योगसाधना करून आपल्यासाठी महत्वाचा ठेवा उपलब्ध करून ठेवला त्याचा फायदा आजही आपल्याला होत आहे. योग हे केवळ इतरांना दाखवायचे प्रात्याक्षिक नसून तो सुदृढ आरोग्याचा ठेवा आहे. त्यामुळे सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने नियमीत योगसाधना करावी, असे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग आणि सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

विश्व योग दिनाच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिका व नेहरू युवा केंद्र संगठन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि शहरातील विविध योग मंडळ व संस्थांच्या सहकार्याने शुक्रवारी (ता.२१) यशवंत स्टेडियम येथे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते.

मंचावर महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, मनपा आयुक्त अभिजीत बांगर, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे कार्यवाह रामभाऊ खांडवे, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, जलप्रदाय समिती सभापती विजय झलके, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, धरमपेठ झोन सभापती अमर बागडे, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, नगरसेविका रूपा रॉय, उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, हनुमान नगर झोन सभापती माधुरी ठाकरे, नेहरू नगर झोन सभापती समीता चकोले, नगरसेविका संगीता गि-हे, वंदना भगत, नगरसेवक सर्वश्री किशोर वानखेडे, राजेंद्र सोनकुसरे, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त राजेश मोहिते, नेहरू युवा केंद्र संगठन नागपूरचे उपनिदेशक शरद साळुंके, जितेंद्र वैद्य, एनसीसी ग्रुप कॅप्टन एम. कलीम, कर्नल एस.सी. प्रधान, कर्नल एस.एस. सोम, कर्नल पंकज गुप्ता, बेटी बचाव अभियानाचे श्रीकांत देशपांडे, आय.एन.ओ.च्या डॉ.किर्तीदा अजमेरा, प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या रक्षा दिदी, वर्षा दिदी, मनपा निगम सचिव हरीश दुबे, सहायक आयुक्त सर्वश्री महेश धामेचा, महेश मोरोणे, प्रकाश वराडे, गणेश राठोड यांच्यासह शहरातील विविध योगाभ्यासी मंडळ व संस्थांचे प्रतिनिधी आणि मनपाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.


यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, सुदृढ आरोग्य हा निरामय जीवनाचा ठेवा आहे. सुदृढ आणि स्वस्थ आरोग्य हीच प्रत्येकाची खरी संपत्ती आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याप्रती प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. आजच्या धावपळीच्या युगात योगाचे महत्व लक्षात घेउनच संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा जागतिक योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी नियमीत योग करावा, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

यावेळी विविध योगाभ्यासी मंडळाच्या चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठ योग साधकांनी उत्कृष्ठ प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची मने जिकंली. कार्यक्रमाची सुरुवात योगसुत्र वे ऑफ लाईफ यांच्या प्रात्यक्षिकाद्वारे झाली. यानंतर ओशोधारा संघाच्या परविंदर सिंग यांनी हँड पॅन प्लेईंग चे सादरीकरण केले. नागपूर जिल्हा योग अशोसिएशन, श्री. योग साधना केंद्र, आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळे व त्यांच्या चमुने संगीताच्या तालावर योगाचे चित्तथरारक आसने सादर केली. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाद्वारे ईश्वर प्रणिधान, उत्थित विवेकासन आणि योगासन (प्राणायाम)चा सामुहिक अभ्यास झाला. सहजयोग ध्यान केंद्राच्या ध्यानाने कार्यक्रमाची सांगता झाली. मैदानात शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या हजारो योग साधकांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी केले. संचालन ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले तर आभार शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी मानले.

या संस्थांनी घेतला सहभाग

जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, विवेक बहुजन हिताय कल्याणकारी संस्था, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गेनायझेशन, श्री.योग साधना केंद्र, युनिटी एस.ए., नागपूर जिल्हा योग असोसिएशन, वाय.के.ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट, हार्टफुलनेस इन्स्टिट्युट, योगसुत्रा वे ऑफ लाईफ संस्था, निर्भय बेटी सुरक्षा अभियान समिती, ओशोधारा संघ, सहजयोग ध्यान केंद्र, अमित योगासन मंडळ.