Published On : Fri, Jun 21st, 2019

गोरेवाडा तलावाचे कार्य तातडीने पूर्ण करा : प्रदीप पोहाणे

Advertisement

नागपूर: शहरात उद्भवलेल्या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू आहेत. गोरेवाडा तलावातून संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा होत असला तरी सद्या तलाव आटले आहे. त्यामुळे भविष्यात अशी टंचाई निर्माण होउ नये यासाठी तलावाचे खोलीकरण करणे आवश्यक आहे. यासंबंधी सर्व परवानगी प्रक्रिया पूर्ण झाली असून तलावाचे खोलीकरण कार्य तातडीने पूर्ण करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी दिले.

शहराला पाणी पुरवठा करणा-या गोरेवाडा तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू असून या कामाची स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी शुक्रवारी (ता.२१) पाहणी केली. पाहणी दौ-यामध्ये सर्वश्री मनोज अग्रवाल, हर्षद घाटोळे, भूषण इंगळे, श्रीकांत भूजाडे, प्रमोद भस्मे, सवित वालदे आदी उपस्थित होते.

गोरेवाडा तलावाच्या खोलीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे सर्व प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करुनही वन विभागाच्या परवानगीमध्ये झालेल्या दिरंगाईमुळे मनपाकडून नियुक्त करण्यात आलेले पोकलेन गोरेवाडा प्रवेशद्वारावर उभे होते. यानंतर यामध्ये येणा-या त्रुट्या दुर करून अखेर परवानगी मिळाल्यानंतर कामाला सुरूवात झाली आहे. सद्या तलावाच्या खोलीकरण कार्यामध्ये चार पोकलेन व टिप्पर कार्यरत आहेत. या कार्यामध्ये येणारे अडथळे दूर करून खोलीकरणाच्या कामाला गती द्या, असेही यावेळी स्थायी समिती प्रदीप पोहाणे यांनी निर्देशित केले.

गोरेवाडा तलावातील पाण्याची स्थिती, या ठिकाणी नागरिकांच्या सुविधेसाठी करता येउ शकणा-या उपाययोजना, आवश्यक कार्य, यासाठी वेळोवेळी स्थायी समिती प्रदीप पोहाणे यांच्यामार्फत आढावा घेतला जात आहे. यासोबतच गोरेवाडा तलावाची त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे. याशिवाय प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचाही त्यांच्याकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे.

शुक्रवारी (ता.२१) झालेल्या पाहणी दौ-यात शहरातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी भटकंती आणि पाण्यासाठी उद्भवलेल्या परिस्थितीपासून सुटकेसाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही करून कार्याला अधिक गती देण्याचे स्थायी समिती सभापती यांनी निर्देश दिले.

शहरात भविष्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी गोरेवाडा तलावाचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी हर्षद घाटोळे यांनी निवेदनाद्वारे स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांना केली होती.