Published On : Wed, Aug 28th, 2019

उभी हयात एका बाजूला घातली आणि तिन्हीसांजेला उद्धव ठाकरेंच्या दारात पाणी भरायला गेलात – जयंत पाटील

Advertisement

नव्या स्वराज्याचा नवा लढा…

सोलापूर: माळशिरस दि. २८ ऑगस्ट – उभी हयात एका बाजूला घातली आणि तिन्हीसांजेला उद्धव ठाकरेंच्या दारात पाणी भरायला गेलात… वाह रे विश्वासू सहकारी… लोक कसा विश्वास ठेवतील तुमच्यावर अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आमदार दिलीप सोपल यांच्या शिवसेनेतील प्रवेशाचा समाचार माळशिरस येथील जाहीर सभेत घेतला. विधानसभेमध्ये जेवढ्या वेळेला सोपलसाहेब बोलले तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी शिवसेनेवरती टीकाच केलेली आहे आणि आज ते त्यांच्या दारी बंधन बांधायला गेले असेही जयंत पाटील म्हणाले.

शिवबंधन बांधायला गेलेल्या दिलीप सोपल यांच्यावर जोरदार हल्लाबोल करतानाच विश्वासू बोलणार्‍या दिलीप सोपल हे सत्ता बघून उडी मारून इकडे आले आहेत हे कळल्याशिवाय राहणार नाही असेही जयंत पाटील यांनी सांगितले.मुख्यमंत्री साहेबांना पक्षावर आत्मविश्वास असेल तर महाजनादेश यात्रा काढावी लागली नसती असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

सीतेवर शंका आल्यावर रामाने काय केलं हे आपल्याला माहीत आहे तशीच ईव्हिएम बंद करुन बॅलेटवर निवडणूक घेण्याची अग्नीपरिक्षा द्या असे आव्हान जयंत पाटील यांनी दिले. दिवंगत हनुमंतराव डोळस हे नेहमी आदरणीय शरद पवार यांच्या विचारांचे पाईक आणि त्यांना मानणारे होते. माळशिरस तालुक्यातील लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना राष्ट्रवादीचा आमदार म्हणून निवडून दिले याचा मला सार्थ अभिमान आहे अशा शब्दात जयंत पाटील यांनी आदरांजली वाहिली.

या सभेत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडताना येणार्‍या निवडणूकीत जनतेला सावध राहण्याचे आवाहन केले.सभेत महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी यांनी आपले विचार मांडले. माळशिरस येथील पक्षकार्यालयाचे उदघाटन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.

शिवस्वराज्य यात्रेचा आजचा दहावा दिवस असून सोलापूर जिल्हयातील माळशिरस येथे पहिली सभा पार पडली.या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण आदींसह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.