Published On : Wed, May 9th, 2018

स्वतःसाठी किमान पंधरा मिनिटे द्यावीत – अमृता फडणवीस

मुंबई: धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी किमान पंधरा मिनीटे काढल्यास आनंदी आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगता येईल, असे अमृता फडणवीस यांनी सांगितले. अन्न व औषध प्रशासन, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि ‘दिव्यज फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.

श्रीमती फडणवीस पुढे म्हणाल्या, संगणकासमोर सातत्याने काम करणारे तसेच दीर्घ तास काम करणाऱ्यांना गुडघेदुखी, पाठदुखी यासारख्या छोट्या मोठ्या तक्रारीपासून त्यांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम दिसू लागतात, नियमीत किमान पंधरा मिनिटे योगा आणि ध्यान साधना केल्याने आरोग्यदायी जीवन जगणे शक्य आहे. प्रत्येक व्यक्ती आरोग्यदायी असेल तरच राष्ट्र आरोग्यदायी होईल, असेही त्या म्हणाल्या.

चार तास चाललेल्या या कार्यक्रमात मीकी मेहता यांच्या चमूने योगाचे प्रात्यक्षिक केले तर रवी सक्सेना यांनी ध्यान साधना शिकविली, नियोमी शाह यांनी आरोग्यदायी आहाराचे महत्त्व सांगितले आणि सुनील रोहकाले यांनी आर्थिक नियोजन करून मनःशांती मिळविण्यासंबंधी मार्गदर्शन केले. अन्न व औषध प्रशासन आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे सुमारे 200 अधिकारी व कर्मचारी यांनी या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी दिव्यज फाउंडेशनच्यावतीने साहस या ॲसिड हल्ल्यातील महिलांसाठी काम करणाऱ्या संस्थेस पाच लाखांचा धनादेश श्रीमती फडणवीस यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त महानगर आयुक्त (मु. म. प्र. वि. प्राधिकरण) प्रवीण दराडे, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, दिव्यज फाऊंडेशनच्या पल्लवी श्रीवास्तव आणि केविन शाह उपस्थित होते.