Published On : Wed, May 9th, 2018

बांग्लादेशच्या माध्यम प्रतिनिधींनी घेतली मुख्य सचिवांची भेट

Advertisement

मुंबई : बांग्लादेश मधील माध्यम संस्थांचे संपादक आणि प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांची भेट घेतली. भारत दौऱ्यावर आलेले हे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आले आहे.

आज सायंकाळी सहाच्या सुमारास मुख्य सचिवांची शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, माहिती व जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह उपस्थित होते.

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून औद्योगिकीकरणासोबतच मनोरंजन नगरी म्हणून तिची जागतिक ओळख असल्याचे सांगत मुख्य सचिवांनी देशाच्या विकासात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगितले. भारत आणि बांग्लादेशमधील वाणिज्यिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्य सचिवांनी यावेळी व्यक्त केला.

बांग्लादेशमधील शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी भारत आणि बांग्लादेश यांच्या संबंधावर भाष्य करत मुंबई आणि या महानगरीविषयीचे आकर्षण बांग्लादेशवासियांमध्ये कशाप्रकारे आहे याविषयी माहिती दिली. औद्योगिक आणि मनोरंजन क्षेत्रातील वाणिज्यिक आदान-प्रदान होणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.

यावेळी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक अजय अंबेकर, शिवाजी मानकर, राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव सतीश जोंधळे आदी उपस्थित होते.

शिष्टमंडळामध्ये ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाचे सचिव राजेश उईके, बांग्लादेशमधील माध्यमांचे प्रतिनिधी अल्तमास कबीर, इक्बाल सोभन चौधरी, मोझम्मल हक बाबू, एम. शोएब चौधरी, अहमद जोबीर, सईम सोभन अन्वीर यांचा समावेश होता.