Published On : Thu, Jun 21st, 2018

ऑटिझमच्या दिव्यांगांनाही मिळणार आता सर्व सुविधांचा लाभ – अश्विन मुदगल

Advertisement

नागपूर: राज्यात ऑटिझम (स्वमग्न) मुलांना दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे वैद्यकीय, शैक्षणिक तसेच इतर कुठल्याही योजनेचा लाभ मिळत नव्हता. अशा दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे राज्यात पहिले केंद्र ठरले आहे. दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे भविष्यातील त्यांचे जीवन सुसह्य होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात ऑटिझमग्रस्त मुलांना नॅशनल ट्रस्ट ॲक्ट नुसार स्वमग्न दिव्यांग म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी बोर्ड तयार करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या 40 दिव्यांगांना आज दिव्यांग प्रमाणपत्र जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते एका विशेष समारंभात राहुल रमन या मुलाला पहिले प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

Gold Rate
13 May 2025
Gold 24 KT 94,300/-
Gold 22 KT 87,700/-
Silver/Kg 97,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी, मानसिक रोग विभाग प्रमुख डॉ. प्रशांत टिपले, सहयोगी प्राध्यापक डॉ. शिल्पा लांजेवार, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राचे अभिजीत राऊत, डॉ. मनिष ठाकरे आदी उपस्थित होते.

दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजना व त्यांचा प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वय ठेवण्यासाठी प्राधान्य असल्याचे सांगताना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल म्हणाले की, दिव्यांगाना रेल्वेचे ही प्रमाणपत्र देण्यात येईल. भविष्यात सन्मानाने जगता यावे तसेच त्यांना शैक्षणिक व वैद्यकीय पुनर्वसन करतांना कुठलीही अडचण जाणार नाही. याकरिता प्रत्येक दिव्यांगांना प्रमाणपत्रासह त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याला प्राधान्य दिले आहे. सिकलसेल ग्रस्तांनाही दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी सूचना यावेळी त्यांनी दिली.

स्वमग्न हे असे रुग्ण असतात ज्यांना इतरांशी व्यवहार करावयास, संवाद साधण्यास तसेच शब्द उच्चारण्यास अडचणी येतात. त्यामुळे ते समाजापासून एकटे पडतात. जगामध्ये प्रत्येकी 160 व्यक्तीपैकी 1 स्वमग्न रुग्ण आहे. परंतु त्यांना यापूर्वी दिव्यांग म्हणून मान्यता नसल्यामुळे ते लाभापासून वंचित होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ऑटिझम बोर्ड सुरु झाल्यामुळे दिव्यांगांना लाभ मिळणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे म्हणाले की, दिव्यांगांना सुलभपणे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आवश्यक सुविधा एकत्र उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र देण्यासाठी युनिवर्सल मॉडेल तयार केल्यामुळे प्रमाणपत्र त्वरीत देणे शक्य झाले आहे. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

दिव्यांगांना प्रमाणपत्र वितरणासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र व महानगरपालिका यांनी संयुक्तपणे राबविलेल्या उपक्रमामुळे जिल्ह्यातील विविध प्रकारच्या 18 हजार दिव्यांगांना प्रमाणपत्र वाटप झाले आहे. यामुळे ऑटिझमग्रस्त रुग्णांनाही प्रथमच प्रमाणपत्र वितरित करण्यात येत आहे. त्यामुळे मुलांसोबतच त्यांच्या पालकांनाही दिलासा मिळाला आहे. अशाच प्रकारच्या 21 प्रकारच्या दिव्यांगांचाही यादीत समावेश झाला आहे. ऑटिझमग्रस्त असलेल्या मुलांना दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष सहकार्य केल्याबद्दल डॉ. मनिष ठाकरे, डॉ. संजय काकडे, डॉ. उर्मिला डहाके, डॉ. प्रशांत टिपले, डॉ. स्नेहल शंभरकर, डॉ. राजेश गोसावी, डॉ. शिल्पा लांजेवार तसेच अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांचा सत्कार जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन अभिजीत राऊत यांनी तर आभार डॉ. मनिष ठाकरे यांनी मानले. यावेळी डॉ. सुधीर महाजन, डॉ. सजल मित्रा, डॉ. बनसोड, डॉ. दिप्ती जैन, डॉ. अशोक मधान, डॉ. नितनवरे आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement