Published On : Thu, Jun 21st, 2018

कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी सुलभपणे खरीप कर्ज पुरवठा करा – डॉ. विजय झाडे

Advertisement

नागपूर: खरीप हंगामासाठी कर्ज पुरवठा करताना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफी मिळालेल्या सर्व शेतकरी सभासदांना 30 जूनपूर्वी राष्ट्रीयकृत बँकांनी विशेष मोहीम राबवून कर्ज पुरवठा करावा, अशा सूचना करताना कर्ज पुरवठा न करणाऱ्या बँकांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे यांनी आज दिलेत. तसेच शेतकऱ्याकडून कर्जमाफी संदर्भातील कुठलेही व्याज घेऊ नये, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन सभागृहात शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच खरीप पीक कर्ज पुरवठा यासंदर्भात विविध राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांचे प्रतिनिधी तसेच सहकार व महसूल विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, विभागीय सह निबंधक प्रवीण वानखेडे, जिल्हा सहनिबंधक अजय कडू, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा विशेष लेखापरीक्षक अनिल पाटील, लीड बँक मॅनेजर शरद बारापात्रे, पालकमंत्री याचे विशेष कार्यकारी अधिकारी कुणाल पडोळेआदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी जिल्ह्याला 1 हजार 66 कोटी रुपयाचे उद्दीष्ट असून त्यापैकी 20 हजार 16 शेतकऱ्यांना 207 कोटी रुपयांचे म्हणजेच 17 टक्के कर्ज वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून कर्ज वाटपासाठी सर्व बँकांच्या शाखांनी गती वाढविण्याची आवश्यकता असल्याचे सांगताना सहकार आयुक्त डॉ. विजय झाडे म्हणाले की, शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील सर्व लाभार्थी शेतकरी सभासदांना प्राधान्याने कर्जपुरवठा करण्यासाठी बँकांनी पुढाकार घेऊन 30 जूनपर्यंत जिल्ह्यातील कर्जमाफी मिळालेल्या सर्व सभासदांना नवीन पीक कर्जपुरवठा करण्यात यावा. कर्ज पुरवठा करताना ज्या बँका दिरंगाई करतील अथवा शेतकऱ्यांना सहकार्य करणार नाही, अशा बँकांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

शेतकऱ्यांना कर्जमाफीसंदर्भात माहिती व्हावी आणि कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना बँकेत केवळ अर्ज आणि सातबारा कर्ज उपलब्ध होईल यादृष्टीने प्रत्येक बँकेच्या शाखांना सूचना देण्यात याव्यात, असे निर्देश यावेळी दिले. बँकेच्या प्रतिनिधींनी कर्जमाफी मिळालेल्या प्रत्येक शेतकरी सभासदांशी संपर्क करून त्यांचेकडून नवीन कर्जासाठी अर्ज भरून घ्यावे व या संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना नियमितपणे सादर करावी, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.

कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या जिल्हा उपनिबंधकामार्फत तालुका उपनिबंधक कार्यालयास उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या संपूर्ण याद्या येत्या दोन दिवसात प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात याव्यात यासंदर्भात तहसीलदारांनी ग्रामपंचायत निहाय तपासणी करून तसा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी बैठकीत दिले. कर्जमाफीसंदर्भातील नववी ग्रीन लीस्ट पाठविण्यात आली आहे. बँक निहाय यादी ग्रामपंचायत पर्यंत पोहोचवावी. तसेच कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्यासाठी केवळ अर्ज व सातबारा बँकांपर्यंत पोहोचेल यादृष्टीने तालुका निहाय नियोजन करावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत सुमारे 25 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना बँकामार्फत कर्जपुरवठा प्राधान्याने देण्यात यावा तसेच यापूर्वी कर्जमाफी झाले आहे अशा सर्व शेतकरी सभासदांच्याखात्यावर कर्जमाफीसंदर्भात नोंदी करून सातबारा उपलब्ध करून द्यावा. तालुका स्तरावर दर शुक्रवारी पीक कर्ज मेळावे घेण्यात येतात. त्यासोबतच बँकांनीही अशा प्रकारचे मेळावे घेऊन 30 जूनपूर्वी 40 टक्केपेक्षा जास्त कर्ज पुरवठा होईल यादृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.