Published On : Fri, Sep 3rd, 2021

६१ कूलर्समध्ये सोडले गप्पी मासे गुरुवारी शहरातील ८२९३ घरांचे सर्वेक्षण

नागपूर : डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षण कार्य सुरू असून गुरुवारी २ सप्टेंबर रोजी शहरातील ८२९३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. डेंग्यू प्रतिबंध अभियानांतर्गत मनपाच्या आरोग्य चमूद्वारे डेंग्यू बाधितांच्या निवासस्थानाजवळील परिसरामध्ये सर्वेक्षण करून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.

गुरुवारी (ता.२) झोननिहाय पथकाद्वारे ८२९३ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी २८४ घरे ही दुषित आढळली म्हणजेच या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. याशिवाय ११७ ताप असलेले रुग्ण आढळून आले. १७७ जणांच्या रक्ताचे नमूने तर ०३ जणांचे रक्तजल नमूने घेण्यात आले आहेत. सर्वेक्षणादरम्यान ८९२ घरांमधील कुलर्सची तपासणी करण्यात आली. त्यात ८८ कुलर्समध्ये डासअळी आढळून आली. मनपाच्या चमूद्वारे ८० कुलर्स रिकामी करण्यात आले. ३०५ कुलर्समध्ये १ टक्का टेमिफॉस सोल्यूशन तर ४४६ कुलर्समध्ये २ टक्के डिफ्लूबेंझ्युरोम गोळ्या टाकण्यात आले. तसेच ६१ कुलर्समध्ये गप्पी मासे टाकण्यात आले.

डेंग्यू प्रतिबंधात्मक कार्यक्रमांतर्गत प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरामध्ये किंवा परिसरात कुठेही डासोत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी. डेंग्यू संबंधी कुठलीही सौम्य लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन मनपाच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.