Published On : Tue, Mar 28th, 2017

राज्यभर गुढीपाडव्याचा जल्लोष; नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी शोभायात्रा

gudi-padwa
मुंबई:
पंचांगा, धर्मशास्त्र आणि हिंदू संस्कृतीसह महाराष्ट्राच्या सांस्कृतीक इतिहासात मानाचे स्थान असलेला गुढीपाडवा राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मराठी मनाचा केंद्रबिंदू असलेल्या या सणाचे आणि मराठी नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले जात असून, गुडीपाडव्याच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी शोभायात्रा आणि सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पाडवा साजरा करण्यासाठी राजधानी मुंबईसह राज्यभरातील मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.

मंगळवारी पहाटेपासूनच मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, औरंगाबा आदी शहरांसह राज्यभरातील मंदिरातही भाविकांची गर्दी आहे. सकाळी 8 वाजून 27 मिनीटांनी श्री. शालिवाहन शके १९३९ हमलंबीनाम संवत्सचारा प्रारंभ नवीन वर्षाचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे मुहूर्त गाठण्यासाठी अनेकांची मोठी लगबग सुरू आहे. दरम्यान, खगोल अभ्यासकर्त्यांनी पाडव्याबद्धलचे पूढच्या वर्षाचेही भविष्य आताच नोंदवले असून, त्यानुसार पुढच्यावर्षी गुढीपाडवा दहा दिवस अगोदर म्हणजे १८ मार्च २०१८ रोजी येणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, पाडव्याच्या सणानिमित्त राज्यभरात विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात महिला मंडळ आघाडीवर असून, अनेक ठिकाणी शोभायात्रा, ढोलपथकाचे ढोलवादन, भल्या-मोठ्या रांगोळ्या आदींचे आयोजन करण्यात आले आहे. डोंबिवलीत गणेश मंदिर संस्थानात महारांगोळी साकारण्यात आली आहे. स्वातंत्र्यविर सावरकर यांच्या 51 व्या पुण्यतिथीनिमित्त ही महारांगोळी रेखाटण्यात आली आहे. या रांगोळीत सावरकरांच्या जीवनातील अनेक प्रसंग रेखाटण्यात आले आहेत. ही रांगोळी बनविण्यासाठी 25 महिला आणि 20 पुरूष कलाकारांना तब्बल 28 तासांचा कालावधी लागला. गणेश मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरील सभागृहात ही रांगोळी नागरिकांना पाहता येणार आहे.

दरम्यान, डोंबिवलीसोबतच ठाण्यातही नववर्षाचे स्वागत जल्लोषात केले जात आहे. ठाणेकरांनी तर पाडव्याच्या पुर्वसंध्येलाच नववर्षाच्या स्वागतास सुरूवात केली. ठाण्यातल्या मासुंदा तलावात दीपोत्सव तसंच गंगापूजन करण्यात आलं. कोपिनेश्वर मंदिरात दीप प्रज्वलित केल्यानंतर मासुंदा तलावाच्या काठावर हजारो दिव्याची आरास करण्यात आली. केवळ डोंबिवली, ठाणेच नव्हे तर, संपूर्ण मुंबईसह राज्यभरात पाढव्याचा असाच जल्लोष पहायला मिळत आहे.