Published On : Mon, Apr 2nd, 2018

पालकमंत्र्यांनी घेतला हुडकेश्वर-नरसाळा येथील विकामकामांचा आढावा


नागपूर: हुडेकश्वर-नरसाळा येथील विकासकामाला शासनाने मंजुरी दिली आहे. तेथे आतापर्यंत महानगरपालिकेने केलेल्या कामाचा आढावा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (ता.२) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.

यावेळी स्थायी समिती सभापती विरेंद्र कुकरेजा, आयुक्त अश्विन मुदगल, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेविका स्वाती आखतकर, विद्या मडावी, लिला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, तांत्रिक सल्लागार विजय बनगीरवार, शहर अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभूळकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जयस्वाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) अनिरूद्ध चौगंजकर, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाने, नगररचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, कार्यकारी अभियंता प्रदीप राजगिरे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्र्यांनी मौजा हुडकेश्वर -नरसाळा येथे प्रशासनाने केलेल्या विकासकामाची माहिती आयुक्तांमार्फत जाणून घेतली. मौजा हुडकेश्वर आणि नरसाळा महानगरपालिका क्षेत्रात नव्याने हद्दवाढ झालेल्या भागात नागरिकांच्या सोयी सुविधांच्या विकासकामात विविध ठिकाणी शासनाद्वारे निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली. ताजेश्वर नगर येथील पाणी टाकी सुरू करण्याबाबत पालकमंत्र्यानी विचारले असता पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण झाले असून त्याठिकाणी फीडर लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासोबतच चंद्रमणी नगर आणि सावरबांधे ले-आऊट मधील पाण्याच्या टाकीचे काम प्रगतीपथावर असून पुढील दोन महिन्यात पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली.

हुडकेश्वर व नरसाळा येथील अंतर्गत ३५ किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले असून त्याचा दर्जा ही उत्तम असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी समाधान व्यक्त केले. हुडकेश्वर आणि नरसाळा येथे प्रस्तावित दहन घाटाचा आढावा घेतला. नागरिकांच्या समस्या लक्षात घेता नरसाळा आणि हुडकेश्वर येथे दहन घाट तयार करण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. तेथील नागरिकांच्या समस्या वारंवार येत आहे, त्या जाणून घेण्यासाठी मी स्वत: प्रत्यक्ष जागी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेईन, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. त्याठिकाणी मनोरंजन मैदान विकासाकामांतर्गत स्थापत्य कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

भांडेवाडी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीसंदर्भात आढावा
भांडेवाडी येथील कचरा डेपोला लागलेल्या आगीसंदर्भात व कचरा डेपोतील कचरा विल्हेवाटी बाबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. यावेळी नगरसेविका मंगला गवरे, उपायुक्त राजेश मोहिते, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, उपअभियंता राजेश दुफारे उपस्थित होते. कचरा डेपोला आग लागल्याने त्याचा स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास होतो. त्या ठिकाणी संरक्षक भिंत लावण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. त्या जागेवर मी आणि आयुक्त भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.