Published On : Tue, Mar 31st, 2020

आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये म्हणून पालकमंत्री जयंत पाटील ऑन ग्राऊंड झिरोवर…

इस्लामपूरच्या ‘त्या’ परिसराचा घेतला आढावा


सांगली : आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांच्या व्यवस्थेत कोणत्याही त्रुटी राहू नये हाच आमचा प्रयत्न आहे असे सांगत सांगलीचे पालक जयंत पाटील यांनी कोरोना बाधित इस्लामपूर शहरातील गांधी चौक परिसरात ग्राउंड झिरोवर जाऊन पाहणी केली.

इस्लामपूरात एकत्रच कोरोनाचे २५ रुग्ण आढळल्याने सांगलीचे पालकत्व स्वीकारलेल्या जयंत पाटील यांनी न डगमगता खंबीरपणे परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली आहे. इतकेच नव्हे तर जयंत पाटील यांनी जेथे कोरोना बाधित रुग्ण आढळले त्या इस्लामपूर परिसरात जाऊन पाहणी केली व आढावा घेतला.

या भेटीदरम्यान जयंत पाटील यांनी पोलीस प्रशासन, नगरपालिका यांच्याकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा घेतला. शिवाय नागरिकांनी घाबरून जावू नये, शासनाच्या नियमांचे पालन करावे आणि घरातच रहावे असे आवाहनही केले.

मागील वर्षी आलेल्या महापुराने पश्चिम महाराष्ट्रात थैमान घातले होते. त्यावेळीही जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांनी ग्राऊंड झिरोवर जाऊन पूरग्रस्तांची मदत केली होती. आज त्याचपद्धतीने जयंत पाटील सांगलीच्या जनतेची पालक म्हणून काळजी घेताना दिसत आहेत.