ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशन पदाधिकाऱ्यांशी चर्चा
नागपूर: शेती उत्पन्नापासून तयार करण्यात येणाऱ्या ग्रीन क्रूड ऑईलने विदर्भासह संपूर्ण देश समृद्ध करणार, असा निर्धार केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. यात ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनची भूमिका महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले.
वाढदिवसानिमित्त ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे अध्यक्ष संशोधक डॉ. हेमंत जांभेकर, सचिव अजित पारसे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी या पदाधिकाऱ्यांसोबत गडकरी यांनी जैवइंधन, इथेनॉलनिर्मितीतून शेतकऱ्यांना होणारा फायदा, थेट उद्योगाशी शेतकऱ्यांना जोडणे, उद्योग किंवा रिफाईनरी उभी करणे, रोजगारनिर्मिती, आयात केलेले कच्चे तेलावरील खर्च यावर चर्चा केली.
कृषी मालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी नैराश्याने ते फेकून देतो. या कृषी मालाचा उपयोग इथेनॉल, जैवइंधन निर्मितीसाठी केल्यास देशातील शेतकरी समृद्ध होईल. त्यादिशेने ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे कार्य महत्त्वाचे असल्याचे नमुद करीत गडकरी यांनी पदाधिकाऱ्यांचेही कौतुक केले. चार महिन्यांपूर्वी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी लोकार्पण केलेल्या ‘इंडिया फॉर इथेनॉल’ या ‘वेब पोर्टल’वर आतापर्यंत असंख्य नागरिकांनी भेट दिली. यातील 54 टक्के नागरिक ग्रामीण भागातील किंवा शेतकरी आहेत.
शेतकऱ्यांना त्यांच्याच भागात जैवइंधननिर्मिती प्रकल्प स्थापन करून रोजगार मिळवून देणे, उद्योग सहायता प्रकल्प राबविणे, शेतकऱ्यांना जैवइंधनाबाबत सोशल मिडिया, इंटरनेट, संगणकाद्वारे सादरीकरणातून संपूर्ण माहिती देण्याचे काम ग्रीन क्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाऊंडेशन करीत आहे.
