Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!

Nagpur City No 1 eNewspaper : Nagpur Today

| | Contact: 8407908145 |
Published On : Thu, Jul 12th, 2018

पणजी महानगरपालिकेला द्या ग्रीन बसची माहिती

नागपूर : स्मार्ट नागपूरची सार्वजनिक वाहतूकही स्मार्ट आहे. पणजी शहरातही अशाप्रकारची वाहतूक व्यवस्था तयार झाल्यास रस्त्यांवरील इतर वाहनांचा भार कमी होईल. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाने येथील ‘ग्रीन बस’चे सादरीकरण पणजी महानगरपालिकेच्या पदाधिकारी आणि सदस्यांसमोर करावे, असे निमंत्रण गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांना दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात परिवहन विभागाच्या संचालित ग्रीन बसमधून गुरुवारी (ता. १२) गोवा विधानसभेचे अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी छत्रपती चौक ते विधान भवन असा प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी सदर निमंत्रण दिले. ग्रीन बसच्या या प्रवासात उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील आमदार संजयप्रताप जयस्वाल, परिवहन समितीचे सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, नागपूर शहर उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष अजय पाठक, भाजप अनुसूचिजत जाती मोर्चाचे महामंत्री मनीष मेश्राम, भाजपचे तेजप्रताप सिंग, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे आदी उपस्थित होते.

प्रारंभी परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी गोवा विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत आणि आमदार संजयप्रताप जयस्वाल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यानंतर बस प्रवासादरम्यान सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी ग्रीन बस आणि मनपाच्या परिवहन विभागांतर्गत संचालित सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची माहिती दिली. नागपूर शहरात सुरू असलेल्या ग्रीन बस इथेनॉलवर चालत असून ग्रीन बस आणि आपली बस शहरात दररोज ८४ हजार कि.मी.चा प्रवास करतात.

सुमारे दोन हजार चालक आणि दोन हजार वाहकांना यामुळे रोजगार मिळाला आहे. इलेक्ट्रिक टॅक्सी, बॅटरीवर चालणारे ई-रिक्षानंतर आता इलेक्ट्रिक बसचा प्रयोगही नागपुरात होऊ घातला आहे. भविष्यात नागपुरात येणाऱ्या सर्व खासगी बसेस शहराच्या बाहेर थांबविण्यात येतील. तेथून शहरात येण्यासाठी ग्रीन बस आणि आपली बस सेवा देतील. यामुळे उत्पन्नात भर पडेल, अशी माहिती श्री. कुकडे यांनी दिली.

नागपूर महानगरपालिकेअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ग्रीन बस आणि वाहतूक व्यवस्थेची प्रशंसा करीत विधानसभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी अशी वाहतूक व्यवस्था सर्वच शहरात असेल तर प्रदूषण कमी होण्यास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, असे म्हटले. वॉटस्‌ ॲप तक्रार क्रमांक, टोल फ्री क्रमांक, येणाऱ्या तक्रारींचे केलेले निरसन ह्या सर्वच बाबी प्रशंसनीय आहेत. पणजीमध्येही अशी व्यवस्था व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

Stay Updated : Download Our App
Mo. 8407908145