Published On : Mon, Mar 8th, 2021

कर्तृत्व,नेतृत्व, संस्कार देणारी स्त्री महान : महापौर दयाशंकर तिवारी

विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार : दिव्यांगाना ट्रायसिकल तर महिलांना शिवणयंत्राचे वाटप

नागपूर : पुराणातील अरुंधती, स्वातंत्र्य समरातील झांशीची राणी, अहिल्याबाई होळकर, राणी दुर्गावती अशा वीर महिलांचा इतिहास या देशाला लाभला आहे. पळवाट न काढता निष्कर्षावर पोहोचून समस्यांचे निराकरण करणे, ही या देशातील महिलांची खुबी आहे. नेतृत्व करणारी, संस्कार देणारी, जागृती करणारी, दिशा देण्याचे कार्य करणारी स्त्री ही सर्वार्थाने महान आहे, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

नागपूर महानगरपालिका, समाज विकास विभाग आणि महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह उपमहापौर मनीषा धावडे, महिला व बालकल्याण सभापती दिव्या धुरडे, उपसभापती अर्चना पाठक, नेहरूनगर झोन सभापती स्नेहल बिहारे, सतरंजीपुरा झोन सभापती अभिरुची राजगिरे, लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे, मंगळवारी झोन सभापती प्रमिला मंथरानी, नगरसेविका सोनाली कडू, सुषमा चौधरी, उज्ज्वला शर्मा, उपायुक्त राजेश भगत, समाजकल्याण अधिकारी श्री. दिनकर उमरेडकर उपस्थित होते.

.
पुढे बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, शिकागोच्या धर्म संमेलनात स्वामी विवेकानंद यांनी ‘माय डिअर सिस्टर ॲण्ड ब्रदर’ असे म्हणून संपूर्ण जगाला जिंकले. त्यांच्या बोलण्यातून झालेला स्त्रियांचा सन्मान हा भारताची संस्कृती दर्शविणारा होता. या देशात महिलांचा सन्मान करण्याची परंपरा आहे. ही महिला पुरुषांच्या तुलनेत कुठेही कमी नाही हे दाखवित समाजामध्ये स्त्रियांप्रती असलेली धारणा बदलण्याचेही कार्य स्त्रियांनीच केले. देशाच्या सीमेवर शत्रूपासून रक्षण करणारी स्त्री आज कुठल्याही क्षेत्रात कमी नाही. नागपूर महानगरपालिकेनेही नागपूर शहराच्या एकमेव महिला खासदार अनसुयाबाई काळे यांच्या नावाने प्रत्येक झोनमध्ये समुपदेशन केंद्र सुरू केले. स्त्री जन्माच्या सन्मानासाठी लाडली लक्ष्मी योजना सुरू केल्याचे सांगत सर्व महिलांना शुभेच्या दिल्या.

प्रास्ताविकातून महिला व बालकल्याण समिती सभापती दिव्या धुरडे यांनी कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विषद केली. समाज विकास विभागाच्या वतीने शासनाच्या योजनांच्या स्त्रियांना लाभ देऊन त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यासोबत समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने महिला दिनानिमित्त या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तत्पूर्वी देवी सरस्वती आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना महापौर दयाशंकर तिवारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन ज्योत्स्ना देशमुख यांनी केले. आभार नूतन मोरे यांनी मानले.

कर्तृत्ववान महिलांचा सत्कार
यावेळी विविध प्रांतात कर्तृत्व गाजविणाऱ्या स्त्रियांचा सत्कार करण्यात आला. साहस पुरस्कार प्राप्त, अनेक शिखर सर करणाऱ्या बिमला नेगी देवस्कर, पोलिस उपायुक्त विनिता साहू, कोव्हिड काळात स्थलांतरित मजुरांसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तत्कालिन समाजकल्याण अधिकारी व मनपा निगम सचिव डॉ. रंजना लाडे, पर्यावरण क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सुरभी जयस्वाल, नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या कंपनी सचिव भानुप्रिया ठाकूर, कोव्हिड काळात अतुलनीय कार्य करणाऱ्या डॉ. मिनाक्षी माने, कोव्हिड काळात पाचपावली केंद्र यशस्वीपणे हाताळणाऱ्या डॉ. मीनाक्षी सिंग यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

दिव्यांगांना बॅटरी मोटोराईज्ड ट्रायसिकल आणि महिलांना शिवणयंत्र
समाजविकास विभगाच्या वतीने विविध योजनेअंतर्गत दिव्यांग महिलांना बॅटरी मोटोराईज्ड ट्रायसिकल आणि महिलांना शिवणयंत्राचे वाटप महापौर दयाशंकर तिवारी व अन्य मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अंजू सुहागपुरे, चांदनी कांबळे, नूतन कुकडे, अमिना परवीन फैय्याजुद्दीन यांना बॅटरी मोटोराईज्ड ट्रायसिकल तर प्रिती बावणे, रेखा चौधरी, आसमां कौसर अब्दुल रफिक, रेणुका बोकारे, फातीमा बी शब्बीर शेख या महिलांना शिवणयंत्राचे वाटप करण्यात आले.