सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य संधींचा मार्ग मोकळा करणारा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. त्यांनी सोलापुरात आयटी पार्क स्थापन होणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे नोकरीच्या शोधात तरुणांना मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतर करण्याची गरज राहणार नाही.
सोलापूर दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. जिल्हा प्रशासनाने योग्य ठिकाण निश्चित केल्यावर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारले जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या पार्कमुळे हजारो युवक-युवतींना रोजगार मिळणार असून आयटी कंपन्या, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांना उत्तेजन मिळणार आहे. सोलापूरमध्ये आधीच रस्ते व विमानतळ सुविधा विकसित झाल्याने औद्योगिक वाढीसाठी योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध असल्याचेही फडणवीस म्हणाले.
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी पावले-
मुख्यमंत्र्यांनी आयटी पार्कसोबतच इतरही महत्वाचे प्रकल्प जाहीर केले. शहरातील बंद जलवाहिनी योजना सुरू करण्यात आली असून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाला गती देण्यात आली आहे. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी 850 कोटींच्या जल वितरण वाहिनी प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच, सोलापूर विमानतळाचा विस्तार लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले. या सर्व उपक्रमांमुळे शहराच्या विकासाला नवे बळ मिळेल.
प्रधानमंत्री आवास योजनेतून हजारो घरकुलं-
सोलापुरातील नागरिकांना परवडणाऱ्या घरांची सोय व्हावी यासाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत 1,348 घरांचे वितरण करण्यात आले. पीपीपी मॉडेलवर उभारलेल्या या घरांना केंद्र सरकारकडून थेट आर्थिक सहाय्य मिळाले असून सर्वसामान्यांना कमी किमतीत घरकुल उपलब्ध झाले आहे.
या योजनेअंतर्गत सोलापुरात तब्बल 48 हजार घरांचे नियोजन करण्यात आले असून आतापर्यंत 25 हजार घरांचे बांधकाम पूर्ण झाले आहे आणि 20 हजारांहून अधिक घरांचे वितरण झाले आहे. उर्वरित घरांची कामे वेगाने सुरू आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनासाठी 1,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून गरीबांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची ही मोठी मदत ठरणार आहे.