Published On : Wed, May 17th, 2017

गाळमुक्त धरण ठरले सावरगावच्या शेतकऱ्यांना वरदान

Advertisement
  • धरणातील गाळ थेट शेतकऱ्यांच्या शेतात
  • चार फूट खोलीकरणामुळे साठवण क्षमतेत लक्षणीय वाढ
  • 300 हेक्टर जमिनीला संरक्षित सिंचनाचा लाभ


नागपूर : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या शासनाच्या अभिनव उपक्रमामुळे नरखेड तालुक्यातील मौजा सीपीखापा या 13.22 हेक्टर क्षेत्रातील पाणी साठवण तलावातील गाळ काढण्यात येत असल्यामुळे परिसरातील सुमारे 300 हेक्टर जमीन गाळयुक्त होण्यास मदत झाली आहे. सावरगाव, येणीकोणी आदी गावांतील सुमारे पन्नासपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी स्वखर्चाने तलावातील गाळ शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढण्यास मोठी मदत झाली आहे. गाळमुक्त धरण हे सावरगावच्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे.

सावरगावच्या परिसरात असलेल्या सीपीखापा या साठवण तलावातील गाळ काढण्यात येवून शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. लोक सहभागातून गाळमुक्त धरण ही संकल्पना 1978 मध्ये बांधलेल्या साठवण तलावामध्ये प्रथमच राबविण्यात येत आहे. सुमारे 13.22 हेक्टर परिसरात पसरलेल्या हा तलाव गाळाने भरल्यामुळे साठवण क्षमता अत्यल्प झाली होती. त्यामुळे पावसाचे पाणी तलावातून वाहून जात असल्यामुळे सभोवतालच्या शेतीलाही नुकसान होत होते. या तलावाचे सध्याचे क्षेत्र 10.88 हेक्टर असून पाझर तलावामुळे होणारी सिंचन क्षमता 213 हेक्टर एवढी आहे.

गाळमुक्त तलाव आणि गाळयुक्त शिवार याअंतर्गत काटोलच्या उप विभागीय अधिकारी डॉ. अनिता पठारे तसेच जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या सहाय्याने सीपीखापा या तलावातील गाळ काढण्यात येत आहे. गाळ काढतांना शेतकऱ्यांनी शेतातील उत्पादकता वाढविण्यासाठी स्वखर्चाने गाळ आपल्या शेतात टाकावा. यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र करुन सुमारे पन्नास शेतकऱ्यांनी येथील गाळ आपल्या शेताता टाकायला सुरुवात केली आहे. पाझर तलावातील गाळ साचल्याने सिंचन क्षमता कमी झाली असून चार फूट खोल हा गाळ जेसीबीच्या सहाय्याने शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Today’s Rate
Monday 07 Oct. 2024
Gold 24 KT 76,000 /-
Gold 22 KT 70,700 /-
Silver / Kg 93,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शेतकरी ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतापर्यंत गाळ घेऊन जात आहेत. यामुळे पाझर तलावातील पाण्याची पातळी वाढून 216 हेक्टरपर्यंत श्वाश्वत सिंचनाचा लाभ होणार आहे. यामध्ये पन्नास हेक्टरपर्यंत संतरा फळबागांना निश्चितच लाभ होणार आहे. या तलावामधून साधारणता 2 हजार 400 घनमीटर काढण्याला सुरुवात झाली आहे.

Advertisement

कित्येक वर्षापासून तलावात पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आलेला गाळ हा इतर सर्व खतांपेक्षाही जास्त उपयुक्त असून शेतात गाळ टाकल्यानंतर सुमारे पाच वर्ष कुठलेही खत न टाकता शेतातील सुपीकता वाढण्यास मदत होते. तसेच उत्पादनही वाढते. त्यामुळे स्वखर्चाने तलावातील गाळ वाहून नेत असल्याचे प्रगतीशील शेतकरी मनीष फुके, जयंत दाढे, संजय थोंबरे या शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

संजय थोंबरे या शेतकऱ्याकडे पावणे चार एकर शेत असून यामध्ये 400 संत्र्याच्या झाडासह इतरही उत्पादन घेत असून तलावातील गाळ शेतात टाकल्यामुळे माझी पांढरी शेती काळीशार झाली आहे. गाळ टाकल्यामुळे पुढील तीन वर्ष कुठलेही खत टाकण्याचे आवश्यकता नाही. तसेच उत्पादनामध्येही 30 ते 35 टक्के वाढ होणार आहे. तलावातील गाळ हा शेतकऱ्यांना आर्थिक समृद्धीकडे नेणारा असून दुष्काळाची दोन हात करण्यास निश्चितच मदतच होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी तलावातील गाळ शेतात टाकावा असे आवाहन केले आहे. शेतात गाळ टाकतांना रब्बी हंगामाचे दिवस असल्यामुळे ट्रॅक्टरची उपलब्धता ही अडचण आहे. पण त्यावरही मात करुन धरणातील गाळ शेतात टाकण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला.

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे आज जलयुक्त शिवार कामांची पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उप विभागीय कृषी अधिकारी विजय निमजे, तालुका कृषी अधिकारी बबन जुनघरे, अजय साठे, जलसंपदा विभागाचे उप अभियंता पी. एस. खोब्रागडे, शाखा अभियंता श्री. भागवतकर, जिल्हा परिषदेचे उप अभियंता श्री. भूत व सहाय्यक अभियंता श्री. भुडके तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.