Published On : Mon, Oct 16th, 2017

ग्रामपंचायत निवडणुक: दुसऱ्या टप्प्यातील 3 हजार 692 ग्रामपंचायतींसाठी मतदान सुरू

Advertisement

voting
मुंबई: राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्यातील 3 हजार 692 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे. यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यातील जाहीर कार्यक्रमानुसार आज 4,119 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार होतं. मात्र, 380 ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर काही ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशनपत्रे प्राप्त झाली नाहीत, तर काही ठिकाणी न्यायालयीन स्थगितीमुळे निवडणूक प्रक्रिया घेण्यात येणार नाही. त्यामुळे आज एकूण 3,692 ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.

यामध्ये ठाणे- 14, पालघर- 56, रायगड- 242, रत्नागिरी- 222, सिंधुदुर्ग-325, पुणे- 221, सोलापूर-192, सातारा- 319, सांगली-453, कोल्हापूर- 478, नागपूर-238, वर्धा- 112, चंद्रपूर- 52,भंडारा- 362, गोंदिया- 353 आणि गडचिरोली- 26 अशा एकूण 3692 ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.

दरम्यान, नक्षलग्रस्त गोंदियामध्येही निवडणूक होत असल्याने, येथील संवेदनशील मतदानकेंद्रांवर निवडणूक अधिकाऱ्यांसाठी बसची विशेष सोय करण्यात आली आहे. तसंच संवेदनशील मतदानकेंद्रांवर मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते 3.30 वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहेत. तर इतर ठिकाणी संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची होणार आहे.

गोंदियातील सालेकसा तालुक्यातील आमगाव खुर्द ग्रामपंचायतील नगरपरिषदेचा दर्जा देण्यासाठी गावकऱ्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे. 17 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.