Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Jan 19th, 2018

  सामाजिक आशय जोपासणाऱ्या घटकांना शासनाचे नेहमीच पाठबळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  मुंबई: सामान्यांचे सबलीकरण करणारे आणि संवेदनशीलता जोपासणाऱ्यांच्या गौरवातून इतरांनाही प्रेरणा मिळते. त्यामुळे सामाजिक आशय जोपासणाऱ्या घटकांना शासनाचे नेहमीच पाठबळ राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी डॅाटर्स ऑफ महाराष्ट्र या उपक्रमाच्या पाठीशी राहू असेही आश्वस्त केले. वर्सोवा येथे ‘ती’ फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वर्सोवा महोत्सव २०१८ चे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.

  यावेळी व्यासपीठावार महोत्सवाच्या संयोजिका ‘ती’ फाऊंडेशनच्या अध्यक्ष आमदार डॉ. भारती लव्हेकर, आमदार सर्वश्री विनायक मेटे, नितेश राणे, अभिनेते अक्षय कुमार, ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात आदी उपस्थित होते.

  महोत्सवात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते स्वच्छतादूत अफरोझ शहा, गीतकार समीर अंजान, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, जनसेवा शिक्षण मंडळाचे संचालक मनिष आणि वैशाली म्हात्रे, उद्योजक बालाजी पटेल आदींचा वर्सोवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

  मुख्यमंत्री म्हणाले, सातत्यपूर्ण अशा तीन वर्षांच्या आयोजनाने या महोत्सवाच्या माध्यमातून वर्सोव्याची नवीन ओळख निर्माण केली आहे. डॉ. लव्हेकर यांची वर्सोव्याच्या विकासाची धडपड सुरु आहे. त्यासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. विविध घटकांच्या सबलीकरणाचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारे, लोकांच्या गौरवाने नितीमूल्यांचे जतन करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान होता. ते इतरांनाही प्रेरणादायी ठरते, शिवाय ती व्यक्तिमत्त्वंही प्रेरणा घेऊन अधिक चांगले काम करतात.

  स्वच्छतादूत अफरोज शहा यांचे कार्यही महत्त्वपूर्ण, एक व्यक्ती आपल्या कामातून अनेकांच्या जीवनात परिवर्तन आणू शकतो यांचे उदाहरण त्यांनी घालून दिले आहे. अभिनेते अक्षय कुमार यांचाही गौरवाने उल्लेख केला. त्यांनी संवेदनशील मनाने अनेक चांगले उपक्रम चालविले आहेत. शहीदांच्या कुटुंबियांना मदत, पाणी, स्वच्छता या विषयाबाबतही ते काम करतात. आताही ते महिलांविषयीच्या संवेदनशील विषयाला वाहिलेला पॅडमॅन हा आशयपूर्ण चित्रपट घेऊन येताहेत. डॅा. लव्हेकर यांनी सुरु केलेल्या डॅाटर्स ऑफ वर्सोवा या संकल्पनेचा पुढचा टप्पा म्हणजे डॅाटर्स ऑफ महाराष्ट्रालाही आवश्यक पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

  यावेळी मुख्यमंत्र्यांनी वर्सोवा परिसराच्या विकासासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील. विकास आराखड्यात कोळीवाड्यांचा साकल्याने विचार केला जाईल. जोगेश्वरी पश्चिम रेल्वेस्थानकावरील सरकत्या जिन्याच्या मागणीबाबतही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल, असेही सांगितले.

  सुरवातीला दीप प्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. संयोजिका आमदार डॅा. लव्हेकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्य अहवालाचे प्रकाशन तसेच, मत्स्य व्यवसायाशी निगडित महिला बचत गटाच्या विविध उत्पादनांचेही अनावरण करण्यात आले. अफरोज शहा, आमदार श्री. मेटे, श्री. राणे, अभिनेते अक्षय कुमार यांचीही भाषणे झाली.

  वर्सोवा मेट्रो ग्राऊंड येथे हा महोत्सव २८ जानेवारीपर्यंत चालणार आहे.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145