Published On : Fri, Jan 19th, 2018

सर्वंकष आर्थिक विकासात देशात महाराष्ट्र अव्वल; राज्याचा पुरस्कार मुख्यमंत्र्यांना प्रदान

Advertisement

मुंबई : सर्वंकष आर्थिक विकासात देशात अग्रेसर राज्याचा मान महाराष्ट्राने मिळविला आहे. ‘ग्रोथ इनोव्हेशन लिडरशीप इंडेक्स फॉर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया’ याबाबत फ्रोस्ट सॉलिव्हॅन या जागतिक संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या संशोधनातून महाराष्ट्राला प्रथम क्रमांक मिळाला आहे. देशातील 29 राज्यांचा 100 निर्देशांकांच्या माध्यमातून संशोधन करण्यात आले. फ्रोस्ट सॉलिव्हॅन संस्थेचे जागतिक अध्यक्ष अरुप झुत्शी यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन राज्याचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला.

या संशोधनाच्या माध्यमातून देशातील 29 राज्यांचा आर्थिक विकास या संबंधी संशोधन करण्यात आले. त्यासाठी प्रमुख दहा मापदंडांच्या आधारे संशोधन करण्यात आले असून त्यात संगणकीकरण, आर्थिक समृद्धी, शैक्षणिक कौशल्य, प्रशासनातील परिणामकारकता, गुंतवणूक क्षमता, महिला सबलीकरण, पायाभूत विकास, रोजगार कार्यक्षमता, आरोग्य सुधारणा आणि दळणवळणाच्या सुविधा या निकषांच्या आधारे अभ्यास करुन एकूणच सर्वंकष आर्थिक विकासात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे.

एखाद्या राज्याचा आर्थिक विकास हा विकासदर वाढीबरोबरच डिजिटायझेशन, शिक्षण, रोजगार क्षमता या बाबींशी देखील निगडित असतो आणि याच निकषांच्या आधारावर फ्रोस्ट सॉलिव्हॅन संस्थेमार्फत देशातील विकसित राज्याची निवड केली जाते. या सर्व निकषांच्या परिमाणात महाराष्ट्राने 29 राज्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवित देशात अग्रेसर राहण्याचा मान राखला आहे.

काल फ्रोस्ट सॉलिव्हॅन या संघटनेचे जागतिक अध्यक्ष अरुप झुत्शी व त्यांच्या चमूने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला.